पुणे : भाजप सरकारच्या काळात गुजरातपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात आली. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याची प्रगती गुजरातपेक्षा अधिक वेगाने झाली आहे. महाराष्ट्र राज्याला पहिल्या क्रमांकावर आणले असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करतानाच महाविकास आघाडी सरकारवर देखील टीकास्त्र सोडले.
फडणवीस पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक गणेश बिडकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे 'महाराष्ट्र द्रोह' नव्हे आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. पण सध्या महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू असून जुन्या कामांना स्थगिती देणे एवढेच काम या सरकारला उरले आहे.
विजबिलांबाबत सरकारने घुमजाव केले आहे. या सरकारची एक वर्षात एकही उपलब्धी नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून अतिवृष्टीग्रस्ताना जाहीर केलेली मदतही अद्याप मिळालेली नाही. पंचनामेही अर्धवट आहेत. कोरोना काळात विरोधकांना विश्वासात घेण्यात आले नाही. बैठकांना बोलावण्यात आले नाही. विरोधकांनी केलेल्या सूचननेवर कारवाई केली जात नाही असेही फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना टोला.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात विरोधक राजकारण करीत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली. त्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, तक्रार करण्यासाठी का होईना आमच्या आंदोलनाची दखल घेतली हे काही कमी नाही. -------एकप्रकारे जयंत पाटलांनी पराभव मान्य केला. भाजपाने बोगस नोंदणी केल्याचे वक्तव्य करून जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला आहे. ईव्हीएम मशीनवर आरोप करता येत नाही म्हणून 'कव्हर फायरिंग' केले जात आहे. हा आरोप म्हणजे पुणेकर मतदारांवर अविश्वास दाखविण्याचाच प्रकार आहे.
....
मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांना विविध 'विशेषणां'नी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर फडणवीस म्हणाले, राजकारणात टीका होणे आवश्यक आहे. परंतु, राजकारणाचा स्तर ठेवला जायला हवा. आमच्याकडून आम्ही तो स्तर राखूच पण विरोधकांनीही तो राखावा. आमच्याकडून हा विषय संपला असेही फडणवीस म्हणाले. ------सरकार पडेल याकडे आम्ही डोळे लावलेले नाहीत.... सरकार पडेल याकडे आम्ही डोळे लावून बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. हे अनैसर्गिक सरकार असून ज्या दिवशी ते पडेल; त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.