लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती: राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतील एमडीएस उत्तीर्ण ‘पीजी’ डॉक्टरांची ऑगस्ट २०२२ पासून नियुक्ती रखडली आहे. शासन सेवेत असताना उच्चशिक्षण पूर्ण केले; पण ‘पीजी’ डॉक्टरांची नियुक्ती रखडली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘ब’ तब्बल १२०२ वैद्यकीय, प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या, नियुक्त्या केल्या आहेत.
राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी ९ जून २०२३ रोजी महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘ब’चे वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियमित बदल्या, नियुक्तीचे आदेश जारी केले. तथापि, ऑगस्ट २०२२ पासून शासन सेवेत कार्यरत राहून एमडीएस ही ‘पीजी’ होऊनसुद्धा रिक्त जागांवर डॉक्टरांना नियुक्ती दिली जात नसल्याचे वास्तव आहे. डेंटल पीजीची जागा असणाऱ्या शासकीय रुग्णालयात डेंटल चेअर नसल्याचे अफलातून कारण पुढे करीत ‘पीजी’ डॉक्टरांच्या नियुक्ती रोखण्यात आल्या आहेत.