अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचे भारताशी फार जुने नाते आहे. वाचून आश्चर्य वाटले असेल परंतू हो. त्यांचे पूर्वज 1873 पासून भारतात राहत आहेत. 2013 मध्ये बायडन जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी आपले नातेवाईक मुंबईत राहत असल्याचे म्हटले होते. बायडन 1972 मध्ये जेव्हा वॉशिंग्टनचे सिनेटर झाले होते तेव्हा त्यांना नागपूरहून एक पत्र गेले होते. हे पत्र वाचून खुद्द बायडन यांनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला होता.
बायडन यांचे पूर्वज जॉर्ज बायडन सुमारे दीडशे वर्षांपूर्वी भारतात स्थायिक झाले होते. त्यांचे हे पूर्वज इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीत कॅप्टन होते. निवृत्तीनंतर त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय महिलेशी विवाह केला होता. आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षाच केवळ भारतीय वंशाच्या नाहीत तर राष्ट्राध्यक्षांचेही नातेसंबंध भारताच्या मातीत अगदी खोलवर रुजलेले आहेत.
1972 मध्ये ज्यो यांना लेस्ली बायडन या नावाने पत्र आले होते. नागपूरच्या भारत लॉज आणि हॉस्टेल व भारत कॅफेमध्ये लेस्ली मॅनेजर होते. त्यांनी या पत्रात आपले कुटुंब 1873 पासून नागपूरमध्ये राहतो असा दावा केला होता. सध्या त्यांची नातवंडे नागपूरमध्ये राहतात. लेस्ली यांचे 1983 मध्ये निधन झाले. ‘Illustrated Weekly of India’ च्या अंकामध्ये लेस्ली यांनी ज्यो बायडन यांच्याबाबत वाचले आणि पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला. या पत्राला ज्यो यांनीदेखील उत्तर दिले होते, असे नागपूरमध्ये सायकॉलॉजिस्ट असलेल्या सोनिया बायडेन यांनी पीटीआयला सांगितले.
मुंबईत 24 जुलै 2013 शेअर मार्केटच्या एका कार्यक्रमासाठी बायडन यांना आमंत्रण होतं. या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले, ‘मला माझ्या नागपूरमधील नातेवाईकांकडून पत्र मिळालं होतं. बायडन कुटुंबाचे पूर्वज 18 व्या शतकामध्ये इस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करायचे.’ मात्र पुढे या पत्रावरुन आपण त्या कुटुंबाशी फारसा संवाद साधू शकलो नाही आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवता आली नाही असं सांगत जो बायडेन यांनी खेदही व्यक्त केला होता. आपल्या भारताबद्दलच्या कनेक्शनसंदर्भात बोलताना त्यांनी मस्करीमध्ये, ‘भविष्यात मी भारतातूनही निवडणूक लढवू शकतो’ असंही म्हटलं होतं.