लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘मंजुळा बेशुद्ध पडली तेव्हा आम्ही ड्युटीवरच हजर नव्हतो. तिचा मृत्यू झाला हेदेखील अन्य कर्मचाऱ्यांकडून समजले. मी एक चांगली कर्मचारी आहे. माझ्या कामाबाबत मला प्रशस्तिपत्रकही मिळाले आहे. मंजुळाच्या हत्येमागे माझा काहीही संबंध नसल्याचा दावा मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातील आरोपी जेलर मनीषा पोखरकर हिने केला आहे. सोमवारी तिचा हा जबाब नोंदविण्यात आला.अंडी आणि पावाच्या हिशेबावरून झालेल्या मंजुळाच्या हत्येप्रकरणी जेलर पीएसआय मनीषा पोखरकर, अंमलदार बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. ७ जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेल्या आरोपींचे जबाब नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. सहाही जणींनी आपण काही केले नसल्याचा पवित्रा घेतल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर येत आहे.‘मंजुळा बेशुद्ध झाली तेव्हा मी ड्युटी संपवून घरी निघून गेली होती. माझ्याबाबत कुणाचीच कधी तक्रार आली नाही. मला चांगल्या कामाबाबत प्रशस्तिपत्रकही देण्यात आले आहे. मीसर्वानाच समान मानते. मंजुसोबतही माझे चांगले नाते होते. मी तिचा कधीच दुजाभाव केला नाही. सकाळी नेहमीप्रमाणे मंजूने सर्व रिपोर्ट माझ्याकडे दिले. आमच्यात काहीच वाद झाला नाही. त्यानंतर आम्ही ड्युटी संपवून घरी निघून गेलो. रात्री ती चक्कर येऊन पडली. तिला रुग्णालयात नेले. त्यात तिचा मत्यू झाला ही बाब मला अन्य कर्मचाऱ्यांकडून समजली. मृत्यूनंतर आमचे तडकाफडकी निलंबन केले. तसेच आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यादरम्यान आम्हाला काही बोलूच दिले नाही. मंजूला आपण मारहाण केली नसल्याची माहिती मनीषाने आपल्या जबाबात दिली आहे. संशयित आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळले असले तरी गुन्हे शाखा याबाबत कसून चौकशी करत आहेत. मलाही साक्ष द्यायचीय..मंजुळा शेट्येच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरु असताना एका महिला कैद्याने आपल्याही साक्ष द्यायची असल्याबाबतचा अर्ज किल्ला कोर्टात केला आहे. तिच्या जबाबामुळे याप्रकरणाला नवे वळण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ती महिला कैदी कोण आहे? ती कोणाच्या बाजूने जबाब देणार आहे? अशा अनेक चर्चा जोर धरत आहेत.
मंजुळा मेली तेव्हा आम्ही ड्युटीवरच नव्हतो..!
By admin | Published: July 04, 2017 6:08 AM