वाशिम : भडकलेल्या महागाईचा चटका आणि वाढलेल्या उन्हाच्या झळा सर्वसामान्य माणसाला त्रस्त करून सोडताहेत. सर्वसामान्य माणसांप्रमाणेच राज्याच्या मंत्रीसुद्धा याला अपवाद नाहीत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर वाशिम दौऱ्यावर असताना आज एका रसवंतीसमोर अचानक थांबल्या.
ॲड. यशोमती ठाकूर या वाशीम दौऱ्यावर असताना खेडा येथील एका रसवंतीजवळ त्यांनी आपली गाडी थांबवली. रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंती जवळ येऊन आणि उसाचा रस पिऊन उन्हाच्या झळांपासून होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते आणि अधिकारीसुद्धा येथे थांबले. रसवंतीवर अचानक मंत्री स्वतःहून रस पीत असल्याने रसवंती चालकदेखील भारावून गेला.
ॲड. यशोमती ठाकूर यांनी या रसवंती चालकाची विचारपूस केली. त्याच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेतली. तसेच त्याला काही अडचण असल्यास संपर्क करण्याचे आश्वासन देत त्या पुन्हा आपल्या दौऱ्यावर मार्गस्थ झाल्या. मात्र, ऐन उन्हात मंत्र्यांचा असा पाहुणचार करायला मिळाल्याने आणि त्यांनी दाखवलेल्या सहानभूतीमुळे रसवंतीचालक आनंदून गेला होता.