अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आरक्षणाचे आश्वासन
मुंबई, दि. 31- ‘माझा बाप असता, तर सगळेच मिळाले असते. वेळ लागत असला, तरीही भाजपच्या सत्तेमधूनच धनगर समाजाला आरक्षण मिळणार’, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांच्या २९१व्या जयंतानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) मंगळवारी आझाद मैदानात घेतलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. रासपच्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे बोलत असताना श्रावण वाकसे या कार्यकर्त्याने गोंधळ घातला. ‘गोपीनाथ मुंडे असते, तर धनगरांना आरक्षण मागवण्याची वेळ आली नसती’, अशा शब्दांत मोठमोठ्याने घोषणा देत वाकसे यांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र वाकसे यांना भाषण करण्याची संधी दिली नाही, म्हणून त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा रासपने केला. दानवे यांच्या भाषणानंतर अध्यक्षीय भाषणास उभ्या राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी वाकसे यांच्यासह अनेकांना चिमटे काढले. मुंडे म्हणाल्या की, जानकर यांनी रासपच्या दरवर्षी होणा-या अहिल्यादेवी होळकर जयंती मेळाव्याचे अध्यक्ष पद आजन्मासाठी बहाल केल्याने आनंद झाला.
त्यामुळे माझ्या इतर भावांचे माझ्यावर प्रेम आहे की नाही, हे माहित नाही, मात्र महादेव जानकर या भावाचे माझ्यावर खरे प्रेम आहे. जानकर यांना कधीही वा-यावर सोडणार नाही. श्वासात श्वास असेपर्यंत त्याच्या पाठिशी राहीन. त्यामुळे यापुढे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समाजाच्या मागे नाही, तर पुढे असेन. शिवाय सर्वांच्या आधी मीच रस्त्यावर उतरेन. तरीही गेली ६७ वर्षे इतक्या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडलेल्या समाजाने किमान २ वर्षे जानकर यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन मुंडे यांनी केले. रावसाहेब दानवे यांनीही धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. गेल्या सरकारने कायदेशीर बाजू तपासल्या नसल्याने ते आरक्षण न्यायालयात टिकू शकले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व
बाजूंचा विचार करून न्यायालयात टिकेल, असे आरक्षण देण्याचे दानवे यांनी आश्वासित केले.
केंद्रात नको, राज्यात मंत्रिपद द्या - जानकर
दीड वर्षांपूर्वी केंद्रात जायची इच्छा होती, मात्र आत्ता राज्यात मंत्री व्हायचे आहे, अशा शब्दांत रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी इच्छा व्यक्त केली. मित्र पक्षांचा जास्त अपमान केला नाही, तर भाजपला सत्तेबाहेर जाऊ देणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. राज्यातील वंचित घटकांसाठी सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आयएएस आणि आयपीएस प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणीही जानकर यांनी केली. ऊसतोडीचा कोयता आणि मेंढरे चरवण्याचे काम कायमस्वरूपी बंद करण्यासाठी वंचित घटकाला सुशिक्षित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार...
दानवे आणि मुंडे यांच्यासमोरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, यापुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांतून रासपची शक्ती तपासणार आहे. मात्र भाजपला सत्ता स्थापताना गरज पडल्यास रासप नक्कीच पाठिंबा देईल. मात्र यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वतंत्रच लढल्या जातील.
‘मंत्र्यांना मुंबईत फिरू देणार नाही!’
यावर्षी धनगर आरक्षण दिले नाही, तर सरकारमधील मंत्र्यांना मुंबईत फिरू देणार नाही, असा इशारा यशवंत सेनेने दिला. मात्र यशवंत सेनेला रस्त्यावर उतरण्याची वेळच येणार नाही, अशा शब्दांत रावते यांनी यशवंत सेनेला प्रत्युत्तर दिले.
‘इंदौर ते चौंडी एसटी सेवा!’
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त इंदौर ते चौंडी एसटी सेवा सुरू केल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. शिवाय धनगर आरक्षणालाही त्यांनी यावेळी पाठिंबा दिला. तर राज्याने धनगर आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यास नक्कीच न्याय मिळवून देऊ, असे वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केले.
सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी...
रासपच्या मेळाव्याला सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी, शिवेसना खासदार राहूल शेवाळे, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, आमदार राहूल कुल या बड्या नेत्यांचा समावेश होता. शिवाय रासपचे गुजरातमधील ६ नगरसेवक आणि झारखंड, कर्नाटक, आसाम व विविध राज्यांतील नेत्यांनी व्यासपीठावर गर्दी केली होती.