मुंबई : राजकारणी बोलणार आणि जनता ऐकणार हा नेहमीचा शिरस्ता... आयबीएन लोकमत आयोजित जागर बळीराजाचा सन्मान सोहळ्यात मात्र नेमके याच्या उलट चित्र होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दीपक केसरकर, अर्जुन खोतकर, महादेव जानकर आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासह व्यासपीठावरील नेते चक्क श्रोत्यांच्या भूमिकेत होते. कृषी आणि कृषीसंलग्न व्यवसाय समृद्ध करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा आणि मागण्यांना प्रतिसाद देतानाच समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. भातशेती, गटशेती, आठवडा बाजार, पॉलिहाऊसपासून कृषी मालासाठी आॅनलाइन मार्केट खुले करत शेती व्यवसायात नव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वी प्रयोग करणाऱ्या बळीराजाच्या लेकरांना शेती सन्मान पुरस्कार आणि कृषी उद्योग सन्मानाने गौरविण्यात आले. मानचिन्ह, पुष्पगुच्छ देत विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. दिवसभर चाललेला हा बळीराजाचा जागर उत्तरोत्तर रंगत गेला. मान्यवरांनी शेती व्यवसायातील आपले प्रयोगांचे, अनुभवांचे गाठोडे श्रोत्यांसमोर उघडले. निसर्ग आणि बाजारपेठेच्या कचाट्यात सापडलेली शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी करावयाच्या उपायांवर मंथन झाले. सन्मानप्राप्त शेतकऱ्यांच्या अनुभवकथनामुळे यशस्वी शेती शक्य असल्याची भावना उपस्थितांच्या मनात निर्माण झाली, तर आपल्या प्रयोगांची, संघर्षाची दखल ‘आयबीएन लोकमत’ने घेतली या भावनेने अनेकांना गहिवरून आले. मान्यवरांनी या कार्यक्रमात शेती व्यवसायातील आपले प्रयोगांचे, अनुभवांचे गाठोडे श्रोत्यांसमोर उघडले. निसर्ग आणि बाजारपेठेच्या कचाट्यात सापडलेली शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी करावयाच्या उपायांवर मंथन झाले.शेती सन्मान पुरस्काराचे मानकरी- संजय पाटील, जव्हार (भातशेती संशोधक)- दिनकर पाटील, लातूर (मधसम्राट)- माजिद पठाण, इंदापूर (देशी गायी संवर्धन)- विलास शिंदे, नाशिक (गटशेती)- तेजोमय घाडगे, सांगली (पॉलिहाऊस)- मारुती चापके, नवी मुंबई (आॅनलाइन मार्केटिंग)- गणेश सवने, पुणे (स्वामी समर्थ आठवडा बाजार)- डॉ. रामचंद्र साबळे, पुणे (हवामान तज्ज्ञ)- अभिजित फाळके, वर्धा (आपुलकी)- गणपत गावंढा, वनवासी गाव-जव्हारकृषी उद्योग सन्मानाचे मानकरी- डॉ. विलास काळे, घोडेगाव (पंचतारांकित हॉटेल्सना ताजी भाजी पुरविण्याचे काम)- राजेंद्र राऊत, बार्शी (लक्ष्मी-सोपान खासगी बाजार समितीचा यशस्वी प्रयोग)- संदीप पुंडकर, अकोला (जे.जे. फाइन सूतगिरणी)- शेखर भडसावळे, खोपोली (कृषी पर्यटन)- अमर नसले, सोलापूर (नसले बंधूंची प्रसिद्ध शेंगा चटणी, शेतीपूरक उद्योग)