सचिन लाड -सांगली -महिन्यापूर्वी जन्मलेल्या मुलाला पाहण्याची ओढ. त्यातच दिवाळीचा सण. दोन महिन्यांचा पगार घेऊन गोव्याहून रेल्वेने उत्तर प्रदेशला निघालेला तरुण... पण भिलवडीजवळ रेल्वे अपघातात त्याच्यावर मृत्यूने झडप घातली. गोपाळ कैलास पांडे (वय ३१) असे त्याचे नाव. त्याच्या गावी ही बातमी समजताच, गोपाळचा मृतदेह सायंकाळी येईल, उद्या येईल याची प्रतीक्षा करीत त्याचे कुटुंबीय तब्बल तीन दिवस बसलेले... आणि इकडे मात्र मृतदेह नेण्यासाठी सांगलीत आलेल्या त्याच्या दोन नातेवाईकांना प्रचंड आर्थिक आकडेमोड करावी लागली. या आकडेमोडीत जाणवली समाजाची बधीर झालेली संवेदना...गोपाळ पांडे गेल्या दोन वर्षापासून गोव्यातील वेरणागेट येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होता. उत्तर प्रदेशातील लखनौ-बनारस मार्गावर माहूर हे त्याचे गाव. वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला. महिन्यापूर्वी मुलगा झाला. सुट्टी न मिळाल्याने मुलाला पाहायला जायला त्याला वेळ मिळाला नाही. दिवाळीसाठी मात्र त्याला आठवड्याची सुट्टी मिळाली. सोमवारी सकाळी दहा वाजता तो उत्तर प्रदेशला जाण्यासाठी गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेत बसला. कंपनीकडून दोन महिन्यांचा पगारही घेतलेला. मिरजमार्गे जाणारी ही गाडी सोमवारी रात्री नऊ वाजता भिलवडी (ता. पलूस) येथे आली असता, गोपाळ रेल्वेत दरवाजाजवळ उभा होता. तोल गेल्याने तो धावत्या गाडीतून बाहेर पडला. याची खबर रेल्वेतील अन्य प्रवाशांना लागली नाही. मंगळवारी सकाळी रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला. खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. मिरज रेल्वे पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. तोपर्यंत पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात हलविला. त्याचा भाऊ अभिषेक पांडे मेहुण्यास घेऊन बुधवारी पहाटे मिरजेत आले. रेल्वे अपघातात गोपाळचा मृत्यू झाल्याने रेल्वे पोलीस मृतदेह नेण्यासाठी मदत करतील, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी रेल्वेतून मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रेल्वे प्रशासनाने यासाठी अख्ख्या बोगीचे एक लाख वीस हजार रुपये भाडे सांगितले. एवढी रक्कम देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णवाहिका घेण्याचे ठरविले. रुग्णवाहिका चालकाने मुंबईपर्यंत मृतदेह नेण्यासाठी चाळीस हजार रुपये भाडे सांगितले. ही रक्कमही देणे शक्य नव्हते. या दरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना ही घटना कळताच त्यांनी सांगली जिल्हा युवक काँग्रसचे सचिव जहीर मुजावर यांना मदतीसाठी पाठवले. मुजावर यांनी लगेच मदतीचा हात दिला.मृतदेह विमानतळावरच...मुजावर यांनी रुग्णवाहिका चालकास विनंती करून भाडे कमी करण्यास सांगितले. तोही राजी झाला. मात्र त्याने २० हजाराच्या खाली एक रुपया घेतला नाही. बुधवारी सकाळी मृतदेह रुग्णवाहिकेतून मुंबईपर्यंत नेण्यात आला. तेथून तो रात्री दिल्लीमार्गे विमानाने लखनौला नेण्यात येणार होता. विमानाचे २० हजार रुपये भाडे भरण्यात आले. मात्र रात्री लखनौला जाणारे विमान रद्द झाले. त्यामुळे नातेवाईकांवर पुन्हा संकट कोसळले. रात्रभर मृतदेह विमानतळावरच ठेवण्यात आला. आज (गुरुवार) सकाळी विमानाने तो लखनौला नेण्यात आला.दु:ख आणि प्रतीक्षासोमवारी रात्री गोपाळचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रात्रभर रेल्वे रुळाजवळ बेवारस स्थितीत पडून होता. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्याच दिवशी मध्यरात्रीपर्यंत त्याचा मृतदेह नातेवाईकांना मिळायला हवा होता. मात्र मृतदेह नेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आर्थिक आकडेमोड आणि सौदा ठरत गेला. पैसे देऊनही नातेवाईकांना तब्बल तीन दिवसांनंतर मृतदेह गावी नेता आला. कापडासाठी पाचशे रुपयेमिरज शासकीय रुग्णालयातील शवागृहात गोपाळचा मृतदेह उघडा पडला होता. हा मृतदेह कपड्यात बांधून देण्यासाठीही नातेवाईकांना पाचशे रुपये द्यावे लागले. त्यानंतर मुजावर यांनी एक चादर खरेदी केली आणि त्या चादरीत मृतदेह लपेटण्यात आला. संवेदना बधीर झालेल्या यंत्रणेमुळे मृत्यूनंतर गोपाळच्या मृतदेहाची हेळसांडच झाली. एकूणच समाजातील संवेदना हरपत चालल्याचे दिसून येते.
जेव्हा संवेदना बधीर होतात!
By admin | Published: October 23, 2014 9:16 PM