मुंबई : शिवसेनेची खात्री पटली त्याच दिवशी मी काँग्रेसच्या इतर नेत्यांशी न बोलता थेट सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. आणि हे करण्याची गरज असल्याचे सांगितले. माझ्या सभांचा लाभ काँग्रेसच्या उमेदवारांनाही झाला. जर वेगळी भूमिका घेतली तर त्याचे तोटे त्यांना होते. यामुळे भाजपा वगळून सरकार स्थापन होत असेल तर तात्विक कारणांना विरोध करू नये, त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे अशी चर्चा केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
एबीपी माझाने आज शरद पवार यांची मुलाखत घेतली. यामध्ये पवार यांनी मोठे खुलासे केले. नव्या पिढीच्या सर्व आमदारांना जय़पूरला नेऊन ठेवले. त्याचा फायदा झाला. त्यांच्यात चर्चा झाली. काहीतरी वेगळे करण्याची मानसिकता झाली. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्वाला समजाविण्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी मला सांगितले, असे शरद पवार यांनी सांगितले.
काहीही करायचे असेल तर काँग्रेसला घेऊनच करायचे अशी भूमिका असल्याने काँग्रेसला सत्तेत घेण्यासाठी वेळ लागला. काँग्रेस पक्ष हा सातत्याने शिवसेना आणि तत्सम पक्षांना विरोध करणारा पक्ष आहे. भाजपाचा विचारही करू शकत नाही, तर सेनाही त्यांच्याच विचारसणीचा आहे. वेगवेगळ्या भूमिका घेणारा पक्ष आहे. त्यांच्यासोबत आपण का जायचे अशी भूमिका सोनिया गांधींची होती. यावेळी मी वाद नाही पण मतांवर आग्रही राहिलो. एवढे टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही असे मी सांगितले. तेव्हा त्यांना मी तीन मुद्दे पटवून दिल्याचेही पवारांनी सांगितले.
सोनिया गांधींना तीन प्रसंग सांगितले
इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला पाठिंब्याची भूमिका सांगितली. महाराष्ट्रतील निवडणुकीवेळी बाळासाहेबांनी हातातली सत्ता घालविली. महाराष्ट्रात एकही उमेदवार उभा केला नाही, अशा बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी काही वेगळा विचार करता येणार नाही का, असा प्रश्न सोनिया गांधींसमोर उपस्थित केल्याचा खुलासा शरद पवारांनी केला.
राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभा पाटील यांच्या निवडीवेळी शिवसेनेचा पाठिंबा मिळाला होता. हा निर्णयही बाळासाहेबांनी घेतला होता. प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांना मी बाळासाहेबांना भेटवले होते. हे मुद्दे मी मांडले. यानंतर सोनिया गांधी शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी राजी झाल्याचे पवारांनी सांगितले.