ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 17 - अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, एकमेकांच्या पक्षातील नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमाणात होत आहेत. काँग्रेस खालोखाल शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरू झाले असून, गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत अकोल्यात उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी ठाण मांडून बसले असतानाच मंगळवारी भाजपाने विद्यमान उपमहापौर विनोद मापारी यांनाच पक्षात प्रवेश देत सेनेची शिकार केली आहे.
अकोला महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. भाजपाकडे महापौर तर सेनेकडे उपमहापौरपद देण्यात आले असून, विनोद मापारी यांना उपमहापौर पदाची संधी मिळाली होती. मापारी यांनी या पदाला योग्य न्याय देत संपूर्ण कार्यकाळात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सेनेकडून ते यावर्षीही प्रबळ उमेदवार म्हणून समोर होते; मात्र सध्या अकोल्याच्या राजकारणावर भाजपाचा वाढता प्रभाव पाहता त्यांनी सेनेचे धनुष्य खाली ठेवत भाजपाचे कमळ हाती घेणे पसंत केले आहे. मंगळवारी दुपारी त्यांचा भाजपा कार्यालयात रीतसर प्रवेश करण्यात आला.
विशेष म्हणजे, गेल्याच पंधरवड्यात शिवसेनेतून माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला आहे, तर गेल्या आठवड्यात गावंडे यांच्या समर्थक मानल्या जाणाºया सेनेच्या नगरसेविका योगीता पावसाळे यांनी गावंडे यांच्या पाठीमागे राष्टÑवादीत जाण्याऐवजी भाजपामध्ये प्रवेश घेणे पसंत केल्याने त्या भाजपामध्ये दाखल झाल्या आहेत. आता मापारी यांच्या भाजपा प्रवेशाने सेनेला मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे, सेनेचे संपर्क प्रमुख सावंत अकोल्यात असताना हा प्रवेश सोहळा झाल्याने सेनेच्या नेतृत्वाला जबर धक्का बसला आहे.