प्रवीण दाभोळकर / ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 15 - आषाढीची धामधूम सध्या सगळीकडे आहे. आपण मित्रांसोबत कट्ट्यावर गप्पा मारतोय, समुद्रकिनारी फिरतोय आणि अचानक आपल्यासमोर साक्षात विठोबा समोर आला तर?..तो बोलत नाहीए ..कटेवर हात ठेवून नूसता आपल्याकडे पाहतोय...अशावेळी आपल्या मनात काय विचार येतील? काय बोलू आपण त्याच्याशी? तरुणांकडून येणा-या अॅक्शन-रिअॅक्शनचा अचूक वेध घेणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. ‘रिंगण’ या वारी विशेषांकाच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. हा व्हिडिओ देखील त्याचाच एक भाग...
आषाढी एकादशीनिमित्त प्रकाशित होणा-या ’रिंगण २०१६’ प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूरात श्रीविठ्ठल मंदिरात झालं. यावर्षी रिंगणतर्फे संत निवृत्तीनाथांवर विशेषांक तयार करण्यात आला आहे. रिंगणचे संपादक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड असून त्यांनी संत निवृत्तीनाथांवरील अभ्यास समाजासमोर आणला आहे. या व्हिडिओमध्ये विठ्ठल साकारलेला मकरंद सावंत म्हणतो.. ‘लहानपणी आजी म्हणायची, आषाढीच्या दिवशी पंढरपूरात विठ्ठल नसतोच..मग विठ्ठल नेमका असतो कुठे ? लोकांना विठ्ठलाबद्दल काय वाटत असेल ? याबद्दल मनात औत्सुक्य होतच..या निमित्ताने एक दिवसाचा विठ्ठल बनण्याची इच्छा पूर्ण झाली.’
सिग्नल, रेल्वे स्टेशन, समुद्र किनारी, रस्त्याच्या शेजारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा मानवी विठ्ठल कटेवर हात ठेवून उभा राहीला. काहींनी त्याची विचारपूस केली..काहींनी माथा टेकला..तर अनेकांनी विठ्ठलासोबत सेल्फी काढण्याची इच्छाही पूर्ण करुन घेतली.