ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 25 - एकदा चोरीला गेलेली वस्तू पुन्हा अपवादानेच मिळते, असा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. पण जळगावमधील एका प्रवाशास मात्र वेगळाच अनुभव आला आहे. सचिन सोमवंशी यांना तब्बल दहा वर्षांपूर्वी प्रवासादरम्यान चोरीस गेलेली परत मिळाली आहे. सचिन सोमवंशी यांची बॅग 16 ऑगस्ट 2007 रोजी हरवली होती.
दहा वर्षांपूर्वी सोमवंशी हे जळगावला येत असताना मनमाड रेल्वे स्थानकावर त्यांची बॅग चोरीला गेली. आपली बॅग हरवल्याचे लक्षात येताच सोमवंशी यांनी त्याची तक्रार भुसावळमध्ये केली. मात्र चोरीस गेलेल्या वस्तूंच्या तपासाचे जे काही होते, तेच या बॅगेच्या तपासाचे झाले. अनेक वर्षे लोटली तरी या बॅगचा काही तपास लागला नाही. त्यामुळे आता आपली बॅग काही मिळणार नाही असे गृहित धरून सोमवंश यांनी या बॅगचा विषय सोडला.
प्रत्यक्षात पोलिसांना ही बॅग दहा वर्षांपूर्वीच सापडली होती. पण अधिक तपास आणि चोरट्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याने ही बॅग कोर्टकचेरीत अडकली. पुढे न्यायालयाने ही बॅग मूळ मालकास परत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तब्बल दहा वर्षानी ही बॅग सोमवंशी यांना मिळाली. दरम्यान, चोरीस गेलेली बॅग तब्बल दहा वर्षांनंतर मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.