मुंबई : राज्याबाहेरील नेत्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही कायम ठेवली. राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तसेच, या उमेदवारीवरुन शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा उमेदवार हा परप्रांतीय असल्याने संजय राऊत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर, भाजपनेही धनंजय महाडिक यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. यावरुन मतांचे गणित उघड असताना भाजपकडून कसला दावा केला जातोय? असा सवाल करत तुमची मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊच द्या, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
नाना पटोले म्हणाले, काँग्रेसची चूक नसली तरी चूक दाखवण्याची परंपरा अलिकडच्या काळात केंद्रातल्या आठ वर्षांच्या कमकुवत सरकारनं चालवली आहे. देश बरबाद केलेल्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या निर्णयावर कुरघोड्या करण्याचा त्यांचे हे प्रयत्न आहेत. आमचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांनी आज फॉर्म भरला तेव्हा मराठीतून शपथ घेतली. यातून देशाची एकात्मता आणि भाषेला मानणारा उमेदवार दिसून आला, हायकमांड आम्हाला असा उमेदवार दिल्याबद्दल आम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानतो.
याचबरोबर, राज्यसभेच्या निवडणुकीला आता जास्त दिवस राहिलेले नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दिवसाढवळ्या स्वप्न पाहणारे विरोधक आम्ही पाहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते ज्या मॅजिक फिगरचा दावा करत आहेत. राज्यसभेचे मतदान ओपनली करावे लागते, त्यामुळे एकदा हे लोकांपुढे येऊच द्या. राज्यसभेच्या निवडणुका शक्यतो बिनविरोधच होतात. त्यामुळे ही मॅजिक फिगर एकदा लोकांपुढे येऊच द्या, पण तरीही विरोधकांचा दावा असेल तर आता मला त्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे, अशा शब्दांत नाना पटोलेंनी भाजपला आव्हान दिले आहे.