नुकत्यात झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्रीयन आणि मुंबईकर क्रिकेटपटूंचा सन्मान काल महाराष्ट्र सरकारडून विधिमंडळामध्ये करण्यात आला. या सत्कार सोहळ्यावेळी राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा पकडलेला झेल निर्णायक ठरला होता. त्या झेलाचा आधार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला होता. त्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेंव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
शुक्रवारी भारतीय संघातील खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडाचा उल्लेख केला होता. अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल, जसं कुणी विसरणार नाही. तशीच दोन वर्षांपूर्वी आम्ही ५० जणांनी केलेली कामगिरीही कुणी विसरणार नाही, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं होतं.
दरम्यान, दोन वर्षापूर्वी आम्हीही विकेट काढली होती या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, ७० दिवसानंतर खरी मॅच सुरु होणार आहे, दोन वर्षापूर्वी जे झाले तो लपवाछपवीचा, खोक्यांचा खेळ होता. आता खरा सामना जनतेच्या दरबारात होणार आहे. जनतेची काळजी नसलेले मुख्यमंत्री आहेत, सरकारच अदानीसाठी काम करत असून, आता जनताच खोके सरकारची कॅच घेणार आहे. या मॅचनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हिट विकेट होणार आहेत, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.