कल्याण : केडीएमसी परिवहनचा नियोजनाअभावी बोजवारा उडाला असताना गणेश घाट आगाराची जागा वगळता अन्य आरक्षित जागा अद्याप परिवहनच्या ताब्यात आलेल्या नाहीत. १० जुलै २०१४ पर्यंत जागा ताब्यात देऊ, असे आश्वासन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी दिले होते. परंतु आजतागायत याची अंमलबजावणी न झाल्याने नव्याने दाखल होणाऱ्या १८५ बस रस्त्यावर उभ्या करण्याची वेळ परिवहनवर येणार आहे.केडीएमसी परिक्षेत्रात परिवहन उपक्रमासाठी २८ जागा आरक्षित आहेत. सध्या उपक्रमात असलेल्या ७० बससह काही महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या २० बस गणेश घाट आगारात उभ्या केल्या जात आहेत. लवकरच केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरू त्थान अभियानांतर्गत नव्या १८५ बस दाखल होणार आहेत. महापालिका आयुक्तांनी १० जुलैपर्यंत आरक्षित जागा परिवहनच्या ताब्यात देण्यात येतील, असे आश्वासन परिवहन व्यवस्थापनाला दिले होते. परंतु, विलंब पाहता मनसेच्या सदस्यांनी लवकर जागा हस्तांतरीत करा अन्यथा उपोषण छेडावे लागेल असा इशारा दिला होता. आजतागायत ही जागा देखील हस्तांतरीत न झाल्याने मनसेचा इशारा ही हवेत विरला आहे. (प्रतिनिधी)
भूखंड हस्तांतरणाला मुहूर्त कधी?
By admin | Published: October 23, 2014 3:59 AM