मुंबई - महाराष्ट्राला यावेळी दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. धरणांचा तालुका समजल्या जाणारा आणि मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा शहापूर तालुका सुद्धा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई कधी दूर होणार असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभेत उपस्थित केला.
शहापूर तालुक्यात यावेळी सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याच मुद्यावरून सोमवारी विधानसभेत आमदार पांडुरंग बरोरा यांनी सरकारला जाब विचारला. शहापूर तालुक्यातील पाणी प्रश्न मागील साडेचार वर्षात आतापर्यंत पाच वेळा लक्षवेधीत मांडला, मात्र अजूनही कोणतेही उपयोजना करण्यात आल्या नाहीत. तालुक्यातील २८५ गावांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे. २२५ गावांना ३७ टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची आकडेवारी बरोरा यांनी विधानसभेत मांडली. तर, मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्याची तहान कधी भागवणार असा प्रश्न बरोरा यांनी उपस्थित केला.
भाजप सरकार आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला आदेश दिले होती की,सर्वे करून तातडीने पाणी पुरवठा योजना राबवून पाणी टंचाई दूर करा. प्रत्यक्षात काही काम झालेच नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेतून २८५ गावांसाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता सुद्धा मिळाली आहे. मात्र उद्या संपणाऱ्या अधिवेशनापूर्वी या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, तसेच आगामी निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा काढण्यात यावी अशी मागणी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली.