चाकण : गेल्या अनेक महिन्यांपासून इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली असून, नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारी ही जलपर्णी काढणार तरी कधी? असा संतप्त सवाल संत विचारधारा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व युवा कीर्तनकार भरतमहाराज थोरात यांनी उपस्थित केला आहे.पुणे -नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथील भीमा नदीच्या पात्रात व चिंबळी, मोशी हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही जलपर्णी केव्हा काढणार, असा प्रश्न भरतमहाराज यांच्यासह खेड तालुक्यातील वारकरी व स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.याकरिता प्रसिद्धी माध्यमांनी अनेकदा आवाजही उठविला होता. त्यामुळे महापालिकेने फक्त एक ते दोन वेळा जलपर्णी काढण्यासाठी अॅक्वेटिकवीर हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे ही जलपर्णी अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने तिच्यापासून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. हिरवेगार क्रिकेटचे मैदान दिसणारी ही जलपर्णी त्वरित हटवावी. या मागणीवर सभापती विलास कातोरे, चिंबळीचे उपसरपंच हेमंत जैद, अमोल जैद, मोईचे माजी सरपंच जीवन येळवंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे, विकास येळवंडे व येथील नागरिक ठाम आहेत.>राजगुरुनगर, मोशी, चिखली, मोई, निघोजे, कुरुळी, चिंबळी, केळगाव, डुडूळगाव, गोलेगाव, मरकळ आदी ठिकाणी असलेल्या नदीपात्रामधील जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही जलपर्णी तातडीने काढावी व त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी थोरातमहाराज यांनी केली आहे.
नदीपात्रातील जलपर्णी हटणार तरी कधी?
By admin | Published: June 09, 2016 1:26 AM