राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यांना पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. मात्र शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना मुंबईत सत्ता कशी मिळवता येईल याकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, परतीच्या पावसामुळे शेतातील पिके वाहून गेली असून, नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यांना ५० हजत्तर रुपये हेक्टरी मदत द्यावी नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील त्यांनी दिला. त्याचप्रमाणे संपूर्ण गाव अतिवृष्टीमुळे नुकासग्रस्त झाले असताना सरकारला पंचनामे करण्याची गरज काय आहे असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी नुकासनग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. जालन्यात नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते.
उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हाततोंडाशी आलेली पिकं या पावसानं वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकर्यांचे झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीतून घेतला होता.
राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने उपस्थित होते. सुमारे 325 तालुक्यांमध्ये 54,22,000 हेक्टरवर पिकं बाधित झाली आहेत. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.'पंचनाम्यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य सरकार बँकांना देणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले नाही, मात्र, पुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सर्वसाधारण नुकसान भरपाईच्या तीन पट भरपाई देण्यात येत आहे,' असंही त्यांनी सांगितले होते.