लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्याला फोटोग्राफीचा आवडता छंद जपता येत नाही याची खंत आहेच पण ठरल्याप्रमाणे झाले असते तर कदाचित मी फोटोग्राफी केली असती आणि माझ्या फोटोंच्या प्रदर्शनासाठी तुम्हाला बोलविले असते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने धोका दिल्याच्या आरोपाचा एकप्रकारे पुनरुच्चार केला.
दिवाळीनिमित्त पत्रकारांशी वर्षा बंगल्यावर वार्तालाप करताना मुख्यमंत्री बोलत होते. ‘आपण मंत्रालयात कधीपासून नियमित जाणार, या प्रश्नावर ते म्हणाले की, मी लवकरच मंत्रालयात जायला लागेन. कामाशिवाय फिरणे आणि एका जागी बसून काम करणे यात जमीन अस्मानचा फरक आहे. इतकी वर्षे जे मंत्रालयात जात होते त्यांनी जे करून ठेवले ते निस्तारण्याचे काम करीत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाजूला पूर्वी वॉर रूम होती. मी विचार केला, वॉर कोणाशी करायचे? मी संकल्प कक्ष सुरू केला. कोरोनामुळे जरा वेग मंदावला पण आता पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. पेट्रोल-डिझेलवरील राज्याचे कर कमी करून दिलासा देणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, दिवाळी साजरी करताना दिवाळं निघणार नाही याचीही काळजी करावी लागेल.’ दिवाळीनिमित्त आपला संकल्प काय, असे विचारले असता त्यांनी, राज्यातील जनतेने कोरोचा लसीचे दोन्ही डोस घ्यावे, असे आवाहन केले.
आदित्यचे लग्न कधी?आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची गुड न्यूज कधी देणार, या प्रश्नात, ‘त्यासाठी मला आदित्यची ‘मन की बात’ समजून घ्यावी लागेल’, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.