प्रमोद गवळी, नवी दिल्लीआम्ही २५ वर्षांपासून मागणी करीत आहोत. आंबेजोगाई जिल्हा कधी बनणार, असा थेट सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना १२ वर्षांच्या शाळकरी मुलाने केला. तेव्हा काय दृश्य असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. लोकमतमधील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या ४५ विद्यार्थ्यांनी दिल्ली सफरीत राजनाथ सिंह व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांनीही या विद्यार्थ्याचे वय विचारात घेत हसत हसत प्रतिप्रश्न विचारला, २५ वर्षांपासून? तू २५ वर्षांपासून ही मागणी कशी काय करू शकतो? त्यावर मुलाने उत्तर दिले, की माझ्या आधीपासून लोक ही मागणी करीत आहेत. तेव्हा राजनाथ सिंह यांना हसू आवरले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी याबाबत चर्चा करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.लोकमतमधील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या ४५ विद्यार्थ्यांना लोकमतच्या व्यवस्थापनाने हवाई सफर घडविली. त्यात महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व जिल्ह्यांमधील शाळकरी मुलांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी मुंबईहून ही मुले दिल्लीला पोहोचली. एका विद्यार्थ्याने लातूरमधील पाणीटंचाईकडे लक्ष वेधत या शहराचा दौरा करण्याची विनंती केली असता राजनाथ सिंह म्हणाले, की आता लातूरमध्ये चांगला पाऊस पडत आहे. पाण्याची समस्या सोडविली जाईल. या छोटेखानी भेटीत गृहमंत्र्यांनी सर्व मुलांना एकेक पार्कर पेन भेट दिला. याप्रसंगी लोकमतचे व्हाइस प्रेसिडेंट (वितरण) वसंत आवारे, भारत माने (कोल्हापूर), देवीदास वैद्य (अहमदनगर), शैलेंद्र राजपूत (जळगाव), प्रशांत अरक (औरंगाबाद), संजय गुल्हाने (नागपूर), शीलेश शर्मा, नबीन सिन्हा, प्रमोद गवळी, प्रवीण भागवत, अजित तिवारी उपस्थित होते.
आंबेजोगाई जिल्हा केव्हा होणार?
By admin | Published: June 25, 2016 4:06 AM