राज्यातील शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांमध्ये सन २०२१मध्ये सर्वाधिक ३५६ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. अस्मानी अन् सुल्तानी संकटाचे हे सर्व शेतकरी बळी ठरले आहेत. यासाठी शासन - प्रशासनाचे प्रयत्न थिटे पडत असल्याचे वास्तव आहे.
वाढले खासगी सावकारांचे कर्जशेतीप्रधान जिल्ह्यात कधी पावसाअभावी, तर आता अतिपावसामुळे खरिपासह रब्बीची पिके हातची जाणार, अशी स्थिती आहे. नैसर्गिक आपत्ती, नापिकी व यातून वाढलेले बँकांसह खासगी सावकारांचे कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे, या विवंचनेत बळीराजाचा धीर सुटून मृत्यूला कवटाळत असल्याचे वास्तव आहे.
...ही आहेत कारणे
शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ कर्जबाजारीपणाच कारणीभूत नाही, तर काही प्रकरणांमध्ये विविध आजार, कौटुंबीक वाद, व्यसनाधीनता, बेरोजगारी व गरिबी आदी घटकही जबाबदार असल्याचे निरीक्षण आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना गरजू शेतकऱ्यांना मिळत नाहीत व शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, याकरिता वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.