आविष्कार देसाई,
अलिबाग- मोरबे धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्तांकडे वेळोवेळी दाद मागितली होती. मात्र त्यांच्या मागण्यांना सातत्याने केराची टोपली दाखविल्याची धारणा धरणग्रस्तांची झाली आहे. आता त्यांनी कोकण आयुक्तांना पुन्हा पत्र लिहून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे करूनही प्रशासनाला पाझर फुटत नसल्याने धरणग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.खालापूर तालुक्यातील मोरबे धरणासाठी तेथील आदिवासी समाजाच्या जमिनी घेतल्या आहेत. बरीच वर्षे उलटूनही त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आलेले नाही. पिरकडवाडी, आरकसवाडी, उंबरणेवाडी, नम्राचीवाडी, वरोसे कातकरवाडी, नानीवली ठाकूरवाडी या आदिवासी वाड्यातील कुटुंब उध्वस्त झाले आहेत. त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे ज्या आदिवासी समाजाच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रश्नांची कोणीच दखल घेतलेली नाही. समाजातील लोकांचे होणारे हाल थांबविण्यासाठी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेने पुन्हा कोकण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी केली आहे.प्रश्न सोडविण्याची मागणीधरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी केली आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही सरकारला जाग येत नसल्याने आता करायचे तरी काय, असा प्रश्न वामन पिरकड, राजू उघडे, संदीप निरगुडा या धरणग्रस्तांनी उपस्थित केला आहे.