"आरोप सिद्ध होऊन शिक्षाही सुनावली, तरी..."; माणिकराव कोकाटेंवरुन वडेट्टीवारांचा अजितदादांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:10 IST2025-02-21T15:05:27+5:302025-02-21T15:10:18+5:30
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय कधी घेणार असा सवाल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केला आहे.

"आरोप सिद्ध होऊन शिक्षाही सुनावली, तरी..."; माणिकराव कोकाटेंवरुन वडेट्टीवारांचा अजितदादांना सवाल
Vijay Wadettiwar on Manikrao Kokate: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली होती. याप्रकरणी अर्ज केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र आता विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कोकाटेंचा राजीनामा का घेतला नाही असा सवाल करत सरकारवर टीका केली आहे.
बनावट कागदपत्रे सादर करून शासकीय सदनिका मिळविल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला शिक्षा सुनावण्यात आली होती. कोकाटे यांनी सरकारी योजनेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे चार फ्लॅट घेतले होते. कोकाटे आणि त्यांच्या भावाने दोन फ्लॅट त्यांच्या नावावर तर अन्य दोन दोघांच्या नावावर दाखवले होते. प्रत्यक्षात हे चारही फ्लॅट माणिकराव कोकाटे हे स्वत:च वापरत होते.
त्यानंतर याप्रकरणी गुरुवारी झालेल्या अंतीम सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना दोषी ठरण्यात आले आहे. यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि एका महिन्यासाठी शिक्षा स्थगित करण्यात आली. यावरुनच आता विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही?
"मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी २४ तासांत आमदारकी रद्द केली. आता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे? धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही? त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही! सत्ता आहे म्हणून ‘आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड‘ ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय?," असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.