'ती' परत आलीये, चौकशीसाठी कधी बोलवणार?; सचिन सावंत यांचा एनसीबीला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 01:05 PM2020-12-30T13:05:22+5:302020-12-30T13:10:03+5:30

Kangana Ranaut : कंगनाची पाठराखण करणारेही आता गप्प असल्याचा सावंत यांचा आरोप

When will NCB call Kangana ranaut for questioning asked congress leader Sachin Sawant | 'ती' परत आलीये, चौकशीसाठी कधी बोलवणार?; सचिन सावंत यांचा एनसीबीला सवाल

'ती' परत आलीये, चौकशीसाठी कधी बोलवणार?; सचिन सावंत यांचा एनसीबीला सवाल

Next
ठळक मुद्देकंगनाची पाठराखण करणारे गप्प असल्याचा सचिन सावंत यांचा आरोपभाजपानं जनतेची माफी मागण्याचीही केली मागणी

 "बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडीओवरून एनसीबीची चौकशी सुरू आहे. हा व्हिडीओ दोन वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी राज्यात फडणवीस सरकार होते. त्यावेळी याची चौकशी केली नाही. बॉलिवूडला जाणीवपूर्वक दहशतीखाली ठेवण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. तर स्वतः ड्रगचे सेवन करणारी व दुसऱ्यांना जबरदस्तीने ड्रग घेण्यास भाग पाडणाऱ्या कंगना रणौतला मात्र आजपर्यंत एनसीबीने चौकशीला बोलावले नाही. आता ती पुन्हा मुंबईत आलेली आहे त्यामुळे कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार हे एनसीबीने सांगावे," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत यांनी केली. 

"कंगणाने स्वतः ड्रग्ज घेत असल्याची कबुली देणारा एक व्हिडीओ अनेक महिन्यांपासून व्हायरल झाला आहे. तिचा एक मित्र अद्ययन सुमन यांनंही कंगना ड्रग घेण्यास भाग पाडत होती तोही व्हिडीओ जगजाहीर आहे. बॉलिवूडमधील ड्रग संदर्भात आपल्याकडे माहिती असून ती आपण देऊ असंही कंगनानं जाहीरपणे सांगितलं होतं. असं असताना एनसीबी त्याकडे गांभीर्यानं का पहात नाही आणि तिला चौकशीसाठी का बोलावत नाही. कंगनाला मोदी सरकारने पुरवलेली वाय दर्जाची सुरक्षा आजही तिला आहे. या सुरक्षेचा खर्च जनतेच्या पैशातून होतो, तो वाया जात आहे," असंही सचिन सावंत यावेळी म्हणाले. 

कंगनाची पाठराखण करणारेही गप्प

"कंगनाची पाठराखण करणारे भारतीय जनता पक्षाचे लोकही याविषयावर आता गप्प आहेत. राम कदम यांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी केली होती. ड्रग्ज संदर्भात कंगनाकडील माहिती बाहेर आल्यास अनेकांचे पितळ उघडं पडेल म्हणून महाविकास आघाडी सरकार ती माहिती उघड होऊ देत नाही असा आरोपही राम कदम यांनी केला होता. एवढी महत्वाची माहिती दडवणे हाही गुन्हाच आहे. त्यामुळे राम कदम यांनी कंगनाला तिच्याकडे असलेली माहिती एनसीबीला देण्यास सांगावं," असंही ते म्हणाले. "या संपूर्ण प्रकरणात भाजपाने कंगनाला साथ देत महाराष्ट्राची बदनामी केली. कंगनाचा बोलवता धनी भाजपा आहे हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजपण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपाने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे," असंही सावंत म्हणाले.
 

Web Title: When will NCB call Kangana ranaut for questioning asked congress leader Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.