मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू होणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे. अर्थातच अंतिम निर्णय हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा असेल आणि आयोग कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक १० ऑक्टोबरला झाली होती. ही महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे म्हटले जात होते. मात्र सोमवारी सकाळी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत. आता उद्याची मंत्रिमंडळ बैठक ही शेवटची असेल असे म्हटले जात आहे. महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आणि शासन निर्णयांद्वारे निर्णयांचा सपाटा लावला आहे, त्यात उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीची भर पडणार आहे.
भाजपच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले की मंत्री महोदयांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात १५ तारखेलादेखील आम्ही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. निवडणूक आचारसंहिता १६ किंवा १७ तारखेला लागेल, असा भाजपच्या गोटातून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आचारसंहिता १५ तारखेला लागू होईल अशी आयएएस लॉबीमध्ये चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया निकालासह २६ नोव्हेंबर पूर्वी पूर्ण केली जाईल असे केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधीच स्पष्ट केले आहे. आचारसंहितेचा कालावधी ३० दिवसांचा असेल हे लक्षात घेता आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू केली जाण्याची शक्यता आहे. कारण निकालानंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन २६ नोव्हेंबर पर्यंत घ्यावे लागणार आहे.
जास्तीत जास्त निर्णय घेता यावेत म्हणून महायुती सरकार पद्धतशीरपणे निवडणुकीला बगल देत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. मात्र, हा आमचा अधिकार नाही, निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असे महायुतीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजपमध्ये हालचालीभाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक रविवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईत झाली. विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.