Devendra Fadanvis: शेतकऱ्यांना मदतीचे पैसे कधी मिळणार?, फडणवीसांनी विधानसभेत सांगितली तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 04:08 PM2022-08-23T16:08:15+5:302022-08-23T16:10:50+5:30
सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे नेते व्यस्त आहेत.
मुंबई - अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या, सरकार म्हणतंय मदत करतो. मात्र, मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणेच जास्त आणि कामात शून्य आहे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल केला होता. विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या मदतीच्या अंमलबजावणीच्या टिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. तर, शिवसेनेनंही शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, केवळ घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याची टिका सरकारवर केली होती. या टिकेला फडणवीसांनी आज विधानसभेत उत्तर दिलं.
15 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 23, 2022
राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. अतिवृष्टीनंतर आम्ही तातडीने दौरा केला आणि पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यंदा 121% टक्के अधिक पाऊस झाला आणि तोही अल्पावधीत. त्यामुळे, दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत आणि एनडीआरएफपेक्षा दुप्पट अशी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, गोगलगाय आणि अन्य कारणांमुळे नुकसान झाले, ते निकषात बसत नसले तरी गुलाबी बोंडअळी वेळी जसा वेगळा GR काढून मदत केली, तसाच वेगळा GR काढून मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार, 15 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच, हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.