राज्यात सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला असला तरी पहिल्या अंकावरच अद्याप काही निर्णय लागलेला नाहीय. एकनाथ शिंदेंनीउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पद घालवत भाजपसोबत जात स्वत: मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यासह बंड करणाऱ्या १६ आमदारांवरील अपात्रतेची कारवाईवरील सुनावणीला अद्याप सुरुवात झालेली नाहीय. अशातच आणखी वर्षभराने विधानसभेची निवडणूक लागणार आहे. मग निकाल कधी लागणार असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला आहे. याला आता अनेक महिने होऊन गेले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच असे सांगत आहेत, परंतू त्याला मुहूर्त काही मिळत नाहीय. सुरुवातीला शिवसेनेची घटना अभ्यासणार असल्याचे ते सांगत होते, परंतू, दोन महिने होत आले तरी त्यांच्या काही हालचाली दिसत नसल्याचे पाहून ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर नार्वेकरांनी दोन्ही गटांकडून उत्तर मागविले होते.
शिंदे गटाने यावर वेळ वाढवून मागितली होती, ती देखील नार्वेकरांनी दिली होती. आता शिंदे गटाने सहा हजार पानांचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. आता एवढ्या पानांचा अभ्यास कधी करणार असा सवालही राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यावर सुनावणीला दिरंगाई होणार नाही. योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.