राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी अनेक गौप्यस्फोट करतानाच अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवृत्तीवरही स्पष्टपणे बोलले. कॉर्पोरेटमध्ये, सरकारी नोकरीत निवृत्तीचं वय ५८ असतं. अधिकाऱ्यांसाठी ६० वर्षे असतं. भाजपामध्ये ७५ वर्षांनंतर निवृत्त केलं जातं. इथं ८२ झालं, ८३ झालं, तुम्ही निवृत्त होणार कधी? दोन मे रोजी झालेल्या बैठकीत तुम्ही राजीनामा देतो म्हणून सांगितलं. मग अचानक तो निर्णय मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असा सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला.
विविध मुद्द्यांवरून गौप्यस्फोट करताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत रोखठोक भाष्य केलं. ते म्हणाले की, २ मे रोजी झालेल्या मीटिंगमध्ये त्यांनी राजीनामा देतो आणि संस्थांच काम पाहतो, असं सांगितलं. त्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी काही जणांची कमिटी नियुक्ती केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला. आम्हीही त्या निर्णयावर सहमत झालो. मात्र दोन दिवसांत असं काय घडलं कुणास ठावूक. दोन दिवसांनंतर तुम्ही राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला, हा कसला हट्टं आहे? का आणि कोणासाठी चाललंय असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
ते म्हणाले की, "कॉर्पोरेट जगतात, सरकारमध्ये निवृत्तीचं वय ५८ असतं. भाजपमध्ये ७५ वर्षे निवृत्तीचं वय आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी बडे नेते त्या वयानंतर निवृत्त झाले. मात्र इथे तुम्ही ८२ झालं, ८३ झालं, तरी काम करताय, तुम्ही निवृत्त होणार कधी? तुम्ही शतायुषी व्हा. पण आम्हाला कधी संधी मिळणार? अशी विचारणाही अजित पवार यांनी केली.