मी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी पूर्ण ताकदीनीशी उभा आहे. त्यांची कारकिर्द यशस्वी होण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन. त्यांच्यात आणि माझ्यात कधीच कुणाला दुरावा अथवा कुरघोडीचे राजकारण दिसणार नाही. कारण आमच्यातली मैत्री नेहमीच कायम आहे. म्हणून मी एवढेच सांगेन, की मी कधी कुणाला उपमा देत नाही. पण, जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकूश होते तेव्हा तेव्हा चाणक्याला चंदगुप्त शोधावा लागतो. हेच या ठिकाणी होताना दिसते आहे. यामुळे हे सरकार मोकळ्या मनाने स्वीकारायला हवे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते शिंदे सरकारने बहुमताची अग्नीपरीक्षा जिंकल्यानंतर विधानसभेत बोलत होते.
ज्यांनी बाहेर राहून अप्रत्यक्ष मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार -“ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मतांनी पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली. त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो,” असे म्हणत फडणवीसांनी सभागृहात टोलेबाजी केली. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले, कर्मावर अढळ निष्ठा असलेले असे व्यक्तीमत्व म्हणजे एकनाथ शिंदे. ते एक कुशल संघटक आहेत, पण ते जनतेचे सेवकही आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या प्रभावामुळे १९८० च्या दशकात त्यांनी शिवसेनेत सक्रिय काम सुरू केले. एखादा साधा कार्यकर्ता, शाखाप्रमुख, अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आज ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतूक केले.
आनंद दीघेंनी १९८४ मध्ये आनंद दीघे यांनी शिंदेंची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. सामान्य माणसाला न्याय देण्याकरत ते आंदोलन करायचे, असेही ते यावेळी अभिनंदनपर प्रस्तावात म्हटले.
पवारांचे मानले आभार, राज ठाकरेंचीही भेट घेणार -शरद पवार यांनीही संघ, संघाची भूमिका, संघाची शिस्त याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला मला आनंद आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे. याचा मला अभिमान आहे. त्यामुळे पवारांचेही मनापासून आभार मानतो. तसेच, मनसेचे नेते राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर प्रत्र लिहिले. त्याला उत्तर द्यायचा विचार केला, पण शब्द सुचले नाहीत. मी त्यांची भेटही घेणार आहे. आपण सगळे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.