आताचे सरकार ही सहकार चळवळ नाहीय, तर सहारा चळवळ आहे. राज्यात दोन लाखांच्यावर सहकारी संस्था आहेत. त्यानंतर भाजपा आणि गुजरात ज्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे. आपल्याकडची महानंदा डेअरी जातेय का राहतेय याची कल्पना नाही. ती अमूल गिळंकृत करतेय का असा प्रश्न पडलाय अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
कर्जतमध्ये मनसेच्या सहकार शिबिरामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज्यातील सहकार चळवळ सांभाळण्यासाठी आजही चांगली माणसे आहेत, उद्याही असतील. सहकार चळवळ ज्योतिराव फुले यांनी चालू केली होती. मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती अशी आहे की विहीरीला ८०० ते ९०० फुट पाणी लागत नाहीय. राजकीय स्वार्थासाठी तिथे साखर कारखाने उभे केले जातायत. म्हणजे तुम्ही ऊस लावणार. त्याला सर्वात जास्त पाणी लागते. नॅशनल जिओग्राफीने सांगितलेय की असेच सुरु राहिले तर मराठवाड्याचे ४०-५० वर्षांत वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिलाय. महाराष्ट्राची जमिन बरबाद होतेय याची कल्पना नाहीय, असे राज ठाकरे म्हणाले.
आज आम्ही आमच्यातच भांडतोय. जातीमध्ये भांडतोय. काय चालुय? हे चालू नाहीय, हे चालविले जातेय. महाराष्ट्र एक राहू नये, एकसंध राहू नये यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरु आहेत. हा राज ठाकरे गेली अनेक वर्षे ओरडून सांगतोय. तुमच्या घराच्या जमिनीचा तुकडा आहे हे तुमचे अस्तित्व आहे. जगात जेवढी युद्धे झाली त्याला इतिहास म्हणतो, तो इतिहास भुगोलाशिवाय पूर्ण होत नाही. भुगोल म्हणजे जमिन. महाराष्ट्र इतका बेसावध आहे. पूर्वी लढाया तरी व्हायच्या, तेव्हा कळायचे तरी जमिनी घ्यायला आलेत. आता राजकारणी एवढ्या शांतपणे जमिनी घेतायत उद्या तुमचे काहीही अस्तित्व राहणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.
आज मी रायगड जिल्ह्यात उभा आहे. शिवडी-न्हावा शेवा पूल झालाय, ज्या ज्या वेळेला असे रस्ते निर्माण झाले तेव्हा आपल्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. उद्या हा रायगड जिल्हा तुमच्या हातातून जाणार आहे. विमानतळ येतोय. बाहेरच्या राज्यातील लोक विकत घेणार इथली जागा. हळूहळू तुम्ही वेगळीच भाषा बोलायला लागणार. कारण ते तुमच्याशी मराठीत बोलणार नाहीत. रायगड जिल्ह्याला माझा निर्वाणीचा इशारा आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सावध केले आहे.
आम्ही जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. कशाला शिवाजी महाराजांना हारतुरे घालता. त्यांनी जे विचार सांगितले ते पाळत नसू तर काय उपयोग. त्यांनी सांगितलेले समुद्रमार्गे शत्रू येईल. कसाब, आरडीएक्स समुद्र मार्गेच आले. आमचे लक्ष नाही. गेल्या ७० वर्षांपासून महाराष्ट्र तोडण्याच्या हालचाली सुरु आहेत. पालघर ते ठाणे जिल्ह्यातला पट्टा हा कोकण पट्टा कधीच हातातून गेलाय. आता रायगडही जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.