मुंबई: मला माझ्या व्यंगाचं दु:ख वाटत नाही. तर अभिमानच वाटतो, अशा शब्दांत विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी आणीबाणीचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. आणीबाणीला आम्ही कडाडून विरोध केला होता. त्यावेळी मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. मात्र त्याची मी तक्रार करत नाही. उलट त्यावेळी झालेल्या त्रासामुळे आलेल्या शारीरिक व्यंगाचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं बागडे म्हणाले. यावेळी त्यांनी तुम्ही आणीबाणीवेळी नेमके कुठे होतात, असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते हरिभाऊ बागडेंनी विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नाना पटोलेंचं अभिनंदन केलं. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांनी आपली बाजू जास्त ऐकून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर भाष्य करताना बागडेंनी आणीबाणीचा संदर्भ दिला. मला ऐकण्यात अडचणी येतात. मात्र आणीबाणीचा सामना करताना मला हे व्यंग आलं. त्यामुळे त्याचं दु:ख वाटण्याऐवजी अभिमानच वाटतो, अशा भावना व्यक्त करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. 'सभागृहातील काहींनी तुम्हाला डावीकडून ऐकायचं, उजवीकडून ऐकायचं, डावीकडे पाहायचं, उजवीकडे पाहायचं असं सांगितलं. मात्र माझ्या ऐकण्याची अडचण आजची नाही. ते व्यंग आणीबाणीतलं आहे आणि त्याचा मला रास्त अभिमान आहे. त्यावेळी माझ्याकडे सत्याग्रह करण्याचं काम होतं. त्यामुळे मी दिवस-रात्र हिंडायचो. प्रचंड थंडीतून प्रवास करायचो. त्या थंडीत हातपाय बधीर व्हायचे. त्याचा परिणाम शरीरावर झाला. मी बेशुद्ध पडलो. पण २-३ दिवस डॉक्टरकडे गेलो नाही. तेव्हा मला ऐकू यायचं नाही. या घटनेला आता ४५ वर्ष झाली. काहींना हे माहीत नसेल, म्हणून आज मी हे सांगतो आहे. तुम्ही त्यावेळी कुठे होतात सांगू का? पण ते आज मी सांगणार नाही. कारण मी विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करायला उभा आहे', असं बागडे यांनी म्हटलं.
आणीबाणीत तुम्ही कुठे होतात, सांगू का...?; माजी विधानसभा अध्यक्षांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 1:17 PM