पुणे - जे नवखे असतात त्यांना तयारी करावी लागते. शिवसेना गेली ५५ वर्ष दसरा मेळावा घेतेय. ही परंपरा आहे. त्यामुळे आम्हाला त्याची तयारी करावी लागत नाही. दुसरे इव्हेंट साजरा करत असतील. शिवसेनेने स्वत:ला सिद्ध केले आहे. दसरा मेळाव्याला परंपरा आहे इव्हेंट नाही. दरवर्षी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला येतात. गर्दी जमवणे म्हणजे यशस्वी होणे असं होत नाही. प्रत्येकाला १ हजार रुपये देणे, खाण्याची सोय करणे, १४०० बसेस आणणे त्यासाठी १० कोटी खर्च करणे हे पैसे कुठून आले? असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला विचारला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्हाला गर्दी जमवण्यासाठी इतकं करावं लागत नाही. शिवसैनिक स्वत:ची पदरमोड करून मेळाव्याला येतो. त्याला वातानुकुलनित बसेसची गरज पडत नाही. दसरा मेळावा एकच आहे. शिंदेंचा इव्हेंट होऊ शकतो. जे भाजपाच्या पैशावर गुवाहाटी फिरून आले. भाजपाच्या खोक्यांवर मिजास मारणारे लोक आमचा मेळावा यशस्वी होणार आहे असं म्हणतात तेच महाविकास आघाडी सरकारसोबत होते. गेली २ वर्ष दसरा मेळावा झाला मग तेव्हा या लोकांनी का सोडलं नाही? असा सवाल त्यांनी केला.
तसेच खोके दिल्यावर हिंदुत्वाचा साक्षात्कार झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक मेळाव्यात येतील की नाही माहिती नाही. परंतु महाराष्ट्रातल्या पुरोगामी संघटना, चळवळी ज्याला उद्धव ठाकरेंचे संयमी नेतृत्व आवडलंय. ज्याला भाजपाचा राग, शिंदे गटाची चीड आहे तो मेळाव्याला येईल. संविधानाची चौकट अबाधित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम नेतृत्व आहे. केवळ शिवसैनिक नाही तर ज्याला उद्धव ठाकरेंचे विचार पटले आहेत तो मेळाव्याला उपस्थित राहील असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
नारायण राणेंचं मानसिक संतुलन बिघडलंयभाजपाची स्क्रिप्ट एकनाथ शिंदे वाचणार आहेत. कागद समोर घेऊन बाळासाहेबांनी भाषण केले नव्हते. एकनाथ शिंदे कागद समोर ठेऊन भाषण करतात. नारायण राणेंचे मानसिक संतुलन ढासळत असून त्यांची काळजी वाटते. जे हिंदुत्व राणेंचे आता जागे झाले ते १० वर्ष सोनिया गांधींकडे सरेंडर करून कुठल्या खुर्चीला टांगून ठेवले होते असा सवाल सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंना केला आहे.