ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4- शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. या कर्जमाफीत शेतकऱ्यांचं दीड लाख रूपयांपर्यंतचं कर्ज राज्य सरकारने माफ केलं. तसंच राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होइल, अशी ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य सरकारने केलल्या कर्जमाफीची जिल्हानिहाय आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या ट्विटर हॅण्डवरून दिली. पण या यादीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. या यादीमध्ये मुंबईतील 813 लाभार्थी शेतकरी दाखविण्यात आले आहेत. यात मुंबईतील 694 तर मुंबई उपनगरातील 119 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पण मेट्रोसिटी असलेल्या मुंबईत एवढे शेतकरी आले कुठून असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
"मुंबईत शेतकरी आहेत का, असा प्रश्न मलाही पडला आहे. पण, कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची जी यादी आम्ही जाहीर केली आहे, ते प्रस्तावित लाभार्थी आहेत. ते सगळेच कर्जमाफीसाठी पात्र आहेत का, याची संपूर्ण चौकशी करूनच त्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी ही इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत दीड लाखापर्यंत कर्ज असलेले शेतकरी आणि सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहेत, अशा शेतकऱ्यांचीही आकडेवारी सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३६ लाख १० हजार २१६ शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक यात लागला आहे. यवतमाळमधील २ लाख ४२ हजार ४७१ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजेच २३ हजार ५०५ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
दरम्यान, कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, हे सगळ्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आणि 40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. म्हणुनच मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे, असं बोललं जातं आहे.