मुंबई – सोशल मीडियाच्या या युगात अनेकजण रातोरात स्टार बनले आहेत. टिकटॉकनं अनेक कलाकारांना डिजिटल व्यासपीठ मिळवून दिले. परंतु कालांतराने भारतात टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेकांनी यूट्यूब आणि इन्स्टाग्रामचा आधार घेतला. ग्रामीण भागातील अनेक कलाकारांना त्यांच्यातील कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. प्रसिद्धीसोबतच पैसे कमवण्याची दुहेरी संधी या कलाकारांना मिळाली. महाराष्ट्र आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या व्हिडीओला लाखो लोकं लाईक्स आणि शेअर करतात.
यातीलच एक प्रसिद्ध जोडी म्हणजे गणेश शिंदे(Ganesh Shinde) आणि योगिता शिंदे(Yogita Shinde), एका ग्रामीण भागातून नावारुपाला आलेल्या या जोडप्यानं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून प्रसिद्धीचं वलय गाठलं. सोलापूरच्या मोहोळमधील या जोडप्याने सोशल मीडियात लाखो लोकांना त्यांच्या कलेने आपलंसं केले आहे. सुरुवातीला लहानशा पत्राच्या घरातून गणेश आणि योगितानं व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्या व्हिडीओला लाईक्स, शेअर वाढत गेले. आजच्या घडीला त्यांच्या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळतात.
गणेश शिंदे, योगिता शिंदे यांच्यासोबत त्यांची लहानशी चिमुकली शिवानी शिंदेही आता व्हिडीओत काम करते. अलीकडेच गणेश शिंदे आणि योगिता शिंदे यांनी कार खरेदी केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यांच्या या पोस्टवर आता अनेकांनी एवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न विचारला आहे. इतकेच नाही तर आता शिंदे जोडप्याला धमक्यांचे फोनही येऊ लागलेत. त्यानंतर गणेश शिंदे याने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत पैसे कुठून आले याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक स्थिती सुधारत असल्याचं गणेश शिंदे आणि योगिता शिंदे यांनी स्पष्ट कबुली दिली. गणेश शिंदे म्हणाला की, आम्हाला यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून पैसे मिळतात. व्हिडीओला मिळणारे लाईक्स, व्ह्यूज यावर आम्ही है पैसे कमावले आहेत. तसेच प्रसिद्धीमुळे आम्हाला एखाद्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून बोलावण्यात येते. तिथेही काही मानधन दिले जाते. साठवलेल्या पैशातून आणि चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमातून आम्ही ही कार खरेदी केल्याचं गणेशनं सांगितले.