भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाओ येथील कॅसिनोमध्ये जुगार खेळतानाचा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच बावनकुळे यांनी जुगारामध्ये साडे तीन कोटी रुपये उडवल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, राऊत यांनी केलेले दावे भाजपाकडून फेटाळण्यात आले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जुगारात उडवण्यासाठी कोट्यवधी रुपये आले, कुठून याची चौकशी करा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे, हा फोटो खरा आहे का? बावनकुळे जुगार खेळत होते का? आणि जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून? याची चौकशी झाली पाहिजे.
दरम्यान काल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाबाबत प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि भाजपा हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात मात्र पराभव झाला. भारतीय संघ जिंकला असता तर त्याचे श्रेय मात्र मोदी व भाजपाने घेतले असते. पण मोदी जेथे जातात तेथे पराभव होतो, त्यांना नशीब व प्रभू रामही साथ देत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे, शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु राज्यातील तिघाडी सरकारी त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वाद सरकार निर्माण करत आहे. राज्यातील अशांततेला एक-दोन मंत्री नाहीतर सर्व सरकारच जबाबदार असून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात आग लावून सरकार मजा पहात आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.