पुणे : अमेठी मतदारसंघात गांधी घराण्याच्या चार पिढ्या कार्यरत असूनही तेथील शेतकऱ्यांचे भले करू शकल्या नाहीत. मग, ते देशातील शेतक-यांचे काय भले करणार, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला. अमेठीतून लढण्याबाबतचा निर्णय अमित शहा घेतील. मात्र, अमेठीतून कमळ विजयी करावे, असे आवाहन मतदारांना करणार आहे असेही त्यांनी नमूद केले. वर्डस काउंट या शब्दोत्सवाचा समारोप इराणी यांच्या हस्ते झाला. विरोधी पक्षांच्या महाआघाडीबाबत बोलताना सायकल पर हाथी बैठा था, तब सायकल पंक्चर हुई थी , असे विधान करत त्या म्हणाल्या, आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर लढणार आहोत. लोकांचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे. सरकारने कायम विकासावर लक्ष केंद्रित केले आहे आणि पक्ष म्हणून विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली जातात. इराणी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मला राज्यसभा खासदार केले, त्यानंतर मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून जबाबदारी दिली. संसदेत प्रवेश केल्यावर माझे माध्यमांतील काम मागे पडले. व्यक्तीच्या योगदानाची क्षमता पाहून राजकारणात संधी मिळत असते. मी पाच वेळा राष्ट्रीय कार्यकारिणीत काम केले. सत्याची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. आता महिला राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. तीन दशकांपूर्वी सुषमा स्वराज आणि सुमित्रा महाजन यांनी काम सुरू केले, तेव्हा परिस्थिती खडतर होती. आता माध्यम आणि समाजमाध्यमे आमच्या मदतीला आहेत. महिला असल्याने नव्हे तर सत्तेमध्ये असल्याने ट्रॉलिंग होते.
गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी तरी शेतकऱ्यांचे कुठे भले केले? स्मृती इराणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 11:56 AM
आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर लढणार आहोत. लोकांचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे.
ठळक मुद्देअमेठीबाबतचा निर्णय अमित शहा घेतील