कुठून आणता मासे....? येथून पुढे फक्त ‘उजनी’चे नका आणू : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:24 PM2018-12-24T16:24:54+5:302018-12-24T16:40:39+5:30
उजनी धरणाचे पाणी विषारी झाले आहे.याबाबतची बातमी वाचुन आपण आश्चर्यचकित झालो...
बारामती : उजनी धरणाचे पाणी विषारी झाले आहे.याबाबतची बातमी वाचुन आपण आश्चर्यचकित झालो. या धरणातील मासे खाताना सावधानता बाळगा,नाहीतर व्हायच तिसरेच काहीतरी, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणातील पाणी प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त केली. बारामती शहरातील मोतीबाग परिसरात काटेवाडी गावातील युवकाने सुरु केलेल्या हॉटेलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी पवार यांनी मोतीबाग परिसरात मच्छी ढाबा चालविणाऱ्या काटेवाडीच्या युवकाला खास शैलीत सल्ला दिला. पवार म्हणाले, म्हणाले,परवा पेपरला वाचताना उजनी धरणाचे पाणी विषारी झाले आहे असी बातमी वाचण्यात आली.. त्यामुळे तुम्ही मासे कोठुन आणता, उजनी धरणातील मासे आणु नका.त्याऐवजी वीर भाटघर किंवा घोडनदीमधून मासे आणा. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. गेल्या अनेक वर्षांपासुन उजनी धरणाच्या प्रदुषणाचा प्रश्न धुमसतो आहे. सोलापूर विद्यापीठानं हे पाणी सतत प्यायल्याने कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता वर्तवली आहे.याबाबत माध्यमांनी वृत्त देखील प्रसिध्द केले आहेत.जलतज्ञ,संशोधकांनी उजनी धरणातले पाणी विषारी असल्याचे निष्कर्ष मांडले आहेत. विद्यापीठाने वर्तविलेल्या शक्यतेवरुन पुन्हा एकदा उजनी धरणाच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर आज पवार यांनी देखील चिंता व्यक्त केल्याने हा प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. पवार यांनी बारामती येथील कार्यक्रमात उजनी धरणातील मासे मच्छी ढाबा चालविणाऱ्या आणून एका व्यावसायिकाला कानपिचक्या दिल्या. पवार यांनी उजनीचं पाणी आणि मासे खाताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला. यावेळी बोलताना त्यांनी एका हॉटेल व्यावसायिकाला मासे कुठून आणतो अशीही विचारणा केली. उजनीचे मासे आणू नका, असा सल्ला पवार यांनी दिला. पवार यांनी दिलेल्या सल्यानंतर मासे खाणाऱ्या खवय्यांच्या भुवया उंचावल्या. उजनीच्या प्रदुषित पाण्यातील माशांवर बिनधास्तपणे ताव मारणाऱ्या खवय्यांना पवार यांचा सल्ला चांगलाच रुचल्याचे यावेळी चर्चेतून दिसुन आले.
————————