अजित पवार राष्ट्रवादी आणि महायुतीतील एकनाथ शिंदे शिवसेना गट, भाजपासोबत सारे काही आलबेल नाहीय. शिंदेंचे मंत्री एकामागोमाग एक अजित पवारांना थेट टार्गेट करत आहेत. कोण म्हणतोय त्यांच्यासोबत बसल्यावर उलटी येते, कोण म्हणतोय अजित पवारांकडील अर्थ खाते नालायक. अशातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. शिंदे, फडणवीस अमित शाहंसोबत आहेत परंतू अजित पवार मुंबईत असूनही शाहंच्या दौऱ्याकडे पाठ फिरविली आहे.
शाह यांनी आज शिंदें, फडणवीसांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. तसेच लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे, फडणवीस, विनोद तावडे, केसरकर, बानकुळे, रावसाहेब दानवे आदी होते. परंतू, महायुतीच्या रिक्षाचे तिसरे चाक अजित पवार कुठेच नव्हते. यावरून राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाल्या आहेत.
बारामतीत लढण्यावरून संभ्रम निर्माण करून अजित पवार रविवारी मुंबईला आले होते. महायुतीची बैठक होती परंतू ती झाली नाही. आज सकाळी शाह मुंबईत आले. परंतू, अजित पवार तिकडे फिरकले नाहीत. महायुतीतून अजित पवार बाहेर पडण्याची देखील चर्चा आहे. रोहित पवारांनी अजित पवारांना तिसरी आघाडी करण्याचे आदेश आले आहेत, असाही दावा केला आहे.
महत्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार जीएसटी बैठकीला उपस्थित राहत नाहीत असा आरोप केला होता. आज दिल्लीत जीएसटीची बैठक आहे. अजित पवारांनी तिकडेही पाठ फिरविली आहे. महायुतीत अर्थमंत्री झाल्यावर ते एकदाच ऑनलाईन उपस्थित होते. आज पवारांनी आदिती तटकरेंना दिल्लीला पाठविल्याचे समजते आहे.
अमित शाह यांच्या गणेश दर्शन दौऱ्याकडे पाठ फिरविणारे अजित पवार हे विमानतळावर महायुतीच्या महत्वाच्या नेत्यांच्या बैठकीला हजर राहणार असल्याचे समजते आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. तसेच महायुतीतील रुसवे फुगवेही काढले जाण्याची शक्यता आहे.