प्रचारात अजित पवारांची राष्ट्रवादी कुठे? पाच राज्यांमधील निवडणुकांपासून दूर ठेेवले की दूर राहिले? चर्चा जाेरात
By यदू जोशी | Published: November 28, 2023 07:08 AM2023-11-28T07:08:15+5:302023-11-28T07:09:11+5:30
Assembly Election 2023: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला प्रचारापासून भाजपने दूर ठेवले की राष्ट्रवादीने अंतर राखले, हा सध्या चर्चेचा विषय आहे.
- यदु जोशी
मुंबई - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेते प्रचाराला उतरले. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला प्रचारापासून भाजपने दूर ठेवले की राष्ट्रवादीने अंतर राखले, हा सध्या चर्चेचा विषय आहे.
शिंदे हे राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचाराला जाऊन आले. ते मंगळवारी तेलंगणामध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. त्यांच्या पक्षाचे मंत्री संजय राठोड हे या आधीच तेलंगणामध्ये आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचा प्रचारासाठी भाजपला उपयोग करवून घेता आला असता. महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांमध्ये त्यांचा फायदाही झाला असता, पण केंद्रीय भाजपने त्याबाबत विचार केला नाही, असे दिसते.
मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या वीस-वीस आमदारांना दोन महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचारासाठीही काही नेते गेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सभा घेतल्या.
भाजपचे नेते म्हणतात...
- महाराष्ट्र भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, प्रचार मोहिमेत कोणाला सामावून घ्यायचे, याचा पूर्णत: निर्णय दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात होतो.
- आम्हाला आदेश येतात त्यानुसार आम्ही अन्य राज्यांमध्ये पक्षाच्या नेत्यांना पाठविण्याबाबतचे नियोजन करत असतो.
- मित्रपक्षांच्या नेत्यांच्या सभा, प्रचार दौरे यांचे नियोजनदेखील दिल्लीतून केले जाते.
राष्ट्रवादीचे नेते म्हणतात...
राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याला याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमच्या पक्षाने या पाचपैकी कोणत्याही राज्यात उमेदवार उभे केलेले नाहीत. आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत. साधारणत: मित्रपक्षांची प्रचारात मदत घेताना कोणत्याही पक्षाकडून अधिकृतपणे तशी विनंती केली जाते. आम्हाला या निवडणुकीतील प्रचाराबाबत भाजपकडून विचारणा झालेली नव्हती.
काँग्रेसनेही मित्रपक्षांना केली नव्हती विनंती
महाराष्ट्रात काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे आणि तिन्ही पक्ष हे इंडिया आघाडीचे सदस्य आहेत. मात्र, आपल्या मित्रपक्षांना प्रचाराची विनंती काँग्रेसकडून करण्यात आलेली नव्हती.