एकीकडे मोदी सरकारविरोधात विरोधक मोट बांधत असताना दुसरीकडे भाजपानेही शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक सुरु झाली आहे. विरोधकांच्या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे तर मोदींच्या बैठकीला अजित पवार, एकनाथ शिंदे असे काहीसे चित्र दिसत आहे. असे असताना दिल्लीत शिंदे-पवार यांना एनडीएच्या या मेगा बैठकीत कुठे स्थान देण्यात आले याची चर्चा सुरु झाली आहे.
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये एनडीएची बैठक बोलविण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला दिल्लीतील हॉटेल अशोका येथे सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेले देशभरातील 38 पक्षांचे प्रमुख उपस्थित आहेत. यावेळी या सर्व पक्षांच्या प्रमुखांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या वतीने तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने उपस्थित आहेत. एनडीच्या बैठकीला ३० पक्षांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष उपस्थित असणार आहेत.
असे असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोदी आणि अमित शाह यांनी आपल्याच रांगेत बसविले आहे. शाह यांनी एकनाथ शिंदेंना एका बाजुला आणि पवार यांना दुसऱ्या बाजुला बसविले आहे. शिंदेंच्या बाजुला नड्डा आणि त्यांच्या बाजुला मोदी बसलेले आहेत. यामुळे एनडीएच्या बैठकीत शिवसेना जुना मित्र असला तरी नव्याने दाखल झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महत्व देण्यात आले आहे.