‘ती’ सध्या आहे कुठे ?
काँग्रेस-भाजपातील इच्छुकांसमोर प्रश्न : बैठकांचा जोर सुरूच
नागपूर : निवडणुकांचे पडघम वाजले...पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्जदेखील भरला...मुलाखतींमध्ये ‘इम्प्रेस’ करणारे सादरीकरणदेखील केले. मात्र काँग्रेस भाजपासह सर्वच पक्षांतर्फे उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर न झाल्यामुळे उमेदवारांच्या मनातील घालमेल वाढीस लागली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असताना मात्र इच्छुकांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे. ‘ती’ सध्या आहे कुठे ?
भाजपाकडे तीन हजारांहून तर काँग्रेसकडे अकराशेहून अधिक इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज आले होते. यात प्रस्थापित नगरसेवकांसोबतच, पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता. ६ ते १४ जानेवारी या कालावधीत भाजपातर्फे एकूण तीन हजार तीन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तर काँग्रेसच्या मुलाखती ८ ते १० जानेवारी या कालावधीत झाल्या.
मुलाखती झाल्यानंतर आता उमेदवारांची यादी कधीपर्यंत जाहीर होते याकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये विविध कयास लावण्यात येत आहेत. शिवाय विविध चर्चांनादेखील उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री या दोघांनीही भाजपाच्या बहुतांश उमेदवारांच्या नावाला हिरवा कंदील दाखविलेला आहे. तर काँग्रेस कमिटीतर्फेदेखील नावे जवळपास ‘फायनल’ करण्यात आली आहेत. मात्र तरीदेखील यादी जारी न झाल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
काँग्रेसची यादी २ तारखेला ?
शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांना यासंदर्भात विचारणा केली असता यादी योग्य वेळ आल्यावर जाहीर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन ते तीन दिवसांत पहिली यादी येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेसची यादीदेखील याच कालावधीत येण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारी रोजी यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोहळेंची गडकरींशी चर्चा
उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी शनिवारी रात्री भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत ठरविण्यात आलेली नावे रविवारी नितीन गडकरींकडे सादर करण्यात आली. विधानसभा निवडणूक प्रचाराचे व्यस्त वेळापत्रक असतानादेखील गडकरी नागपुरातील घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. ते सकाळी गुवाहाटीवरुन नागपूरला आले. दुपारी शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यासह काही पदाधिकाºयांनी गडकरींशी चर्चा केली. यात गडकरी यांनी काही सूचना दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.