ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - 'सर्जिकल स्ट्राईक' या शब्दाचा मूळ अर्थ शत्रू प्रदेशातील नेमक्या ठिकाणावर हल्ला करुन अपेक्षित उद्दिष्टय साध्य करणे. मागच्या आठवडयात भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून यशस्वी सर्जिकल स्ट्राईक्स केले. त्यानंतर सर्वत्र सर्जिकल स्ट्राईक्सची चर्चा सुरु झाली.
वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्र, वेबसाईट जिथे तिथे सर्जिकल स्ट्राईक हा शब्द दिसू लागला. थेट रणभूमीशी संबंधित असलेला हा शब्द सर्वसामान्यांना इतका आपला वाटू लागला आहे की, रोजच्या दैनदिन व्यवहारात सर्जिकल स्ट्राईक्स या शब्दाचा वापर सुरु झाला आहे. प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको परस्पराला धमकावण्यासाठी आता सर्जिकल स्ट्राईक्सची भाषा वापरु लागले आहेत.
समाजमाध्यमात व्हायरल होणा-या प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब सोशल मीडियावर लगेच उमटते. सर्जिकल स्ट्राईक शब्दा बाबतही तसेच झाले आहे. सध्या या शब्दावरुन व्हॉटस अॅप, फेसबुकवर विनोदाची लाट आली आहे. सध्या नवरात्रीच्या दिवसामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक दांडीयाप्रेमींचा हिरमोड होत आहे. त्यामुळे गरब्यावर पावसाचा सर्जिकल स्ट्राईकचे फोटो आणि मेसेजेस फिरत आहेत.