राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातबाजीचा आता भाजपचे नेते देखील खिल्ली उडवू लागले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदेंची पसंती देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त दाखविल्याने भाजपाचे कार्यकर्ते, नेते नाराज झाले आहेत. यासाठी आज पुन्हा सुधारित जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यातच बाळासाहेब ठाकरे यांचाही कालच्या जाहीरातीत फोटो नव्हता, तो आजच्या जाहिरातीत दिसला आहे.
शिंदे यांच्या कालच्या जाहिरातबाजीवरून भाजपाचे उपमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी त्या सर्व्हेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांकच मागितला आहे. देवेंद्र फडणवीसांपेक्षाएकनाथ शिंदेंनाच पहिली पसंती दाखविल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले. या पार्श्वभूमीवर, मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्कमपणे सोबत आहोत, शिवसेना-भाजपची युती आगामी सर्व निवडणुका जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे-फडणवीस यांच्यात तुलना योग्य नाही, जाहिरातीपेक्षा निवडणुकीचा कौल महत्त्वाचा आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर कौलाचा इतकाच विश्वास असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या, असे आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे यांना दिले आहे.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी कोल्हापुरात झाला. त्यानिमित्ताने तपोवन मैदानावर जंगी सभादेखील पार पडली. सभेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावर ‘सततच्या हवाई प्रवासामुळे फडणवीस यांच्या कानाला इजा झाली आहे. हवाई प्रवास करू नका असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असूनही त्यांना दौरा रद्द करावा लागला,’ असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.