मुंबई : आमच्या खेड्यापाड्यातही मुंबई इतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्ष शिवसेना भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ मिळून सगळ खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षात कुठे गेली होती तुमची पारदर्शकता ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन तर होणारच. परिवर्तन तर होणार आहे पण ते भाजपाच्या बाजूने नाही तर काँग्रेसच्या बाजूने होईल, असा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना, भाजपावर हल्लाबोल केला.मुंबई महापालिका रणसंग्रामातील काँग्रेसची शेवटची प्रचारसभा अॅन्टॉप हिल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस या निवडणुकीला पूर्ण तयार आहे. कॉंग्रेसच्या सभांमध्ये लोकांना बसायलाही जागा पुरत नाही इतकी गर्दी आणि प्रतिसाद मिळत आहे. तिकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला मात्र लोकच येत नाहीत म्हणून सभा रद्द केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन होणारच, हो परिवर्तन होणार पण ते भाजपाच्या बाजूने नाही तर काँग्रेसच्या बाजूने होईल. काँग्रेसने लोकांना जोडण्याचे काम केले. शिवसेना भाजपाच्या लोकांनी मात्र मंदीर मशिदीच्या नावाने लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम केले. भाजपावाले म्हणतात, मंदीर वही बनायेंगे तारीख नाही बतायेंगे. आता शिवसेनेवाले म्हणतात राजीनामा देंगे पर तारीख नही बतायेंगे. जे बोलतो ते करून दाखवतो, हा उद्धव ठाकरे यांचा दावा असेल तर त्यांनी आधी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हानही चव्हाण यांनी दिले. (प्रतिनिधी)
२२ वर्षे पारदर्शकता कुठे होती?
By admin | Published: February 19, 2017 2:19 AM