ऑनलाईन लोकमतनागपूर, दि. 29 - आपचे मिशन पंजाब सुरू होण्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ दिवसांच्या विपश्यना शिबिरात सहभागी होणार आहेत. मोदी सरकारला ज्या संघभूमीत ऊर्जा मिळते त्या नागपुरात केजरीवाल विपश्यनेसाठी येत असल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर होती. मात्र ते हिमाचल प्रदेश येथील धर्मशाला येथे जाणार असल्याचे नागपुरातील आम आदमी पार्टीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावरील चर्चेचा आधार घेतला तर ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऊर्जा मिळते त्या नागपुरात १२ दिवस विपश्यनेच्या माध्यनातून मौैन धारण करायचे यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली असावी, असा कयास लावला जात आहे. यासाठी त्यांनी नागपुरातील विपश्यना केंद्राकडे नोंदणी केली असल्याचे सांगितले जात आहे. ९ आॅगस्ट रोजी ते दुपारी १२.३० वाजता नागपुरात दाखल होणार असल्याची माहिती आहे.
मात्र नागपुरातील ज्या माहुरझरी येथील विपश्यना केंद्रावर केजरीवाल यांनी विपश्यनेसाठी नोंदणी केल्याचे बोलले जाते तिथे २७ जुलैपासून शिबिराला सुरुवात झाली आहे. हे शिबिर १० दिवस म्हणजे ७ आॅगस्ट पर्यंत चालेल. साधारणत: विपश्यना शिबिर १०,१५,२०,३०,४५ आणि ६० दिवसांचे असते. त्यामुळे केजरीवाल १२ दिवसांच्या कोणत्या शिबिरात सहभागी होतील. दिल्लीत स्वातंत्र्यदिन सोहळा सोडून मुख्यमंत्री केजरीवाल विपश्यना शिबिरात कसे सहभागी होतील, असा एक प्रवाह आहे.
इकडे आम आदमी पार्टीचे नागपुरातील पदाधिकारी प्रभात अग्रवाल यांनी केजरीवाल नागपुरात येणार असल्याची सोशल मीडियावरील चर्चा चुकीची असल्याचे सांगितले. केजरीवाल अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट देऊन विपश्यनेसाठी धर्मशाला येथे जातील, अशी पोस्ट त्यांनी आम आदमी पार्टीच्या स्थानिक ग्रुपवर केली आहे.