खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात पेटला आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी आज विधिमंडळातही सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर शेतकऱ्यांना अशा प्रकारे जात विचारणे चुकीचे आहे. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात असा प्रकार घडला नव्हता, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. त्यावर आता भाजपाने सडकून टीका केली आहे. जिथे 'जात' शब्द आला, तिथं शरद पवार अॅक्टिव्ह होतात, अशी टीका भाजपामहाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे.
भाजपाकडून या संदर्भात करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जिथे 'जात' शब्द आला, तिथे शरद पवार हे सक्रिय होतात. पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावले. आजही त्यांच्या डोळ्यावर जातीयवादाचा चष्मा तसाच आहे. म्हणूनच कृषिमंत्रालयाच्या संकेतस्थळावर 'प्रवर्ग' विचारण्यात आला असता शरद पवारांना त्यात 'जात' दिसली, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे.
शरद पवारजी, तुम्ही कृषिमंत्री असताना खतांवर सबसिडी मिळत नव्हती. आता सबसिडी मिळत आहे, त्याचा तुम्हाला त्रास होतोय. शेतकऱ्यांना तुम्ही काही दिलं नाही, आम्ही देतोय तर तुम्हाला त्रास का होतोय? तुमचा स्वभाव गुण जातीपातीचं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा आहे, असा टोलाही भाजपाने लगावला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना विचारण्यात आलेल्या जातीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनीही आज सभागृहात आक्रमक भूमिका घेतली होती. अहो शेतकरी आमची जात आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय," असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सरकारला विचारला. तसेच सरकार जातीवाद निर्माण करू पाहतंय का? असा सवाल केला. "रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये," असे अजित पवारांनी सरकारला खडसावले.