विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मेळावा, पर्यावरणाची वारी आदी कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा प्रचार केला. तसेच पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री राहणार की नाही यावरही भाष्य केले.
पर्यावरणाची वारी सगळ्यात भारी. पर्यावरण राहिले तर आपण राहू. त्यामुळे आपण पर्यावरण वाचवले पाहिजे. मागील 15 वर्षांपासून ही पर्यावरणाची वारी सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणीय बदल विभागाचे अभिनंदन करतो, असे शिंदे म्हणाले.
तसेच एक वारकरी, एक झाड ही संकल्पना आहे. पुढील वर्षी पालखी मार्गावर वृक्षारोपण करतोय. 20 लाख बांबूची रोपे लावणार आहोत. बांबू किती उपयुक्त आहे हे आपल्याला लक्षात आले. आपण फक्त कोणाला बांबू.... तो पण लावावा लागतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने लावावा लागतो. माणसाला पण शेवटी बांबूच लागतो, अशा शब्दांत शिंदेंनी राजकीय फटकेबाजी केली.
तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. वारकऱ्यांसाठीच्या योजना, महामंडळाबात माहिती दिली. तसेच पुढील वर्षी तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून येणार का, या प्रश्नावर पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचे की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून आहे, असे शिंदे म्हणाले.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शन साठी तिरुपती बालाजीच्या धरतीवर 103 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहेत. भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचे सहज सुलभ दर्शन घेता येणार आहे. वारकरी शेतकरी कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हे विठुरायाला मुख्यमंत्र्यांनी साकडे घातले.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, वारी हा आनंदाचा दिवस आहे. सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळालं आहे. ही पांडुरंगाची कृपा आहे. मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या ३० टक्के अधिक वाढली आहे. अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करत आहेत. मंदिर समितीने केलेल्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे.