मुंबई : माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एफ एस आय घोटाळ्याचा आरोप करणारे राधाकृष्ण विखे पाटील आता गृहनिर्माण मंत्री झाले आहेत. त्यामुळे नवेगृहनिर्माण मंत्री जुन्या गृहनिर्माण मंत्र्यांना तुरूंगात पाठवणार का, असा सवाल विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत केला. तसेच मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.राज्यपाल अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात दिलेले एकही आश्वासन पाळले नाही, राज्यपालांचे अभिभाषण आणि राज्यातल्या वस्तुस्थितीचा काडीमात्र संबंध नसल्याचे मुंडे म्हणाले. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपने लोकसभेची निवडणूक जिंकली. यापूर्वीच्या सरकारांनी राष्ट्रवादावर कधीच मत मागितली नाहीत कारण त्या सरकारांची कामगिरी भरीव होती, भाजपने मात्र शहिदांच्या नावावर मत मागितली. मूलभूत प्रश्नाना बगल देत ईव्हीएमच्या मदतीने लोकसभा जिंकली अशी टीका मुंडे यांनी केली.भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सत्तेवर येण्यापूर्वी केली होती. उत्पन्न दुप्पट झाले नाही, उलट शेतमालाचे भाव पाडले. आता उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २९२२चा वादा करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, असेही मुंडे म्हणाले.
प्रकाश मेहतांना तुरुंगात टाकणार का; मुंडेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:21 AM