पुणे : केंद्र शासनाकडून अमुक एक मदत मिळाली नाही, 'जीएसटी 'चा वाटा आला नाही, अशी ओरड करणारे महाराष्ट्र सरकार कधी स्वत:च्या खिशात हात घालणार आहे की नाही. असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. कोरोना आपत्तीत केंद्रानेच राज्याला सवोर्तोपरी मदत केली असताना, राज्य सरकारने काय खर्च केला याबाबत श्वेत पत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामाची व कोरोना आपत्तीत केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, कोरोनच्या आपत्तीत देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळेत लॉकडाऊन जाहीर केले. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी २०.९७ लाख कोटींचे पॅकेज दिले. महाराष्ट्र राज्याला १६०० कोटी केवळ मजुरांच्या योजनेसाठी दिले. पण महाराष्ट्र शासनाने काहीही केले नाही. केवळ रेल्वे तिकिटातील १५ टक्के रक्कम दिली. देशातील इतर राज्यांनी केंद्र सरकारचे पॅकेज येण्यापूर्वीच स्वत:चे कोरोना आपत्तीकरिता पॅकेज दिले, तसे महाराष्ट्र सरकारने अद्याप काहीच केलेले नाही. देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. यावर बोलताना पाटील यांनी हा सर्व्हे कोणी केला हे पाहावे लागेल असे सांगून, आमचे ज्या राज्यात सरकार आहे तेथे व केंद्रात आम्हीच क्रमांक एकवर असल्याचे म्हणाले. दरम्यान, राजीव बजाज यांना काय झोपडपट्टीतील कोणालाही लॉकडाऊन बाबत आपले मत व्यक्त करण्याचा लोकशाहीत अधिकार असल्याचे सांगून त्यांनी, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनतेने देशभरात लॉकडाऊनचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य झाल्याचे सांगितले.--------महापौर पास पालकमंत्री नापासकोरोना आपत्तीत पुणे शहरात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या कामाला मी 100 पैकी 100 मार्क देतो असे सांगून पाटील यांनी, पालकमंत्री अजित पवार यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. पवार यांचा स्वभाव पाहता, कोरोना आपत्तीत त्यांनी खाड खाड निर्णय घेणे अपेक्षित होते पण तसे त्यांनी केले नसल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या नावाने ओरड करणारे राज्य सरकार स्वत:च्या खिशात हात घालणार की नाही : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 18:16 IST
देशातील इतर राज्यांनी केंद्र सरकारचे पॅकेज येण्यापूर्वीच स्वत:चे कोरोना आपत्तीकरिता पॅकेज दिले, तसे महाराष्ट्र सरकारने अद्याप काहीच केलेले नाही.
केंद्र सरकारच्या नावाने ओरड करणारे राज्य सरकार स्वत:च्या खिशात हात घालणार की नाही : चंद्रकांत पाटील
ठळक मुद्देकोरोना आपत्तीतील खर्चाची राज्याने श्वेत पत्रिका काढावी