मीरारोड - राज्यात एकत्र आहोत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाशी युती करायची इच्छा आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची की नाही हे स्थानिक भाजपा कार्यकारणी व कोर कमिटी ठरवेल असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. मीरा भाईंदर भाजपाचा आढावा घेण्यासाठी रविवारी आलेल्या बावनकुळे यांनी मीरारोडच्या जिसीसी क्लब मध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आमदार गीता जैन, भाजपा जिल्हाध्यक्ष एड रवी व्यास, माजी आमदार नरेंद्र मेहता आदी उपस्थित होते.
भाजपा आणि शिंदे गटाला आपापली ताकद वाढवायची आहे. त्याचा एकमेकांना उपयोग होणार आहे. पण स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकारणी व कोर कमिटी ठरवेल की त्यांना युती करायची की नाही करायची ते. त्या नंतर प्रदेश नेतृत्व त्या प्रस्तावावर विचार करेल की कोणत्या जागी युती करायची की नाही करायची ते असे बावनकुळे म्हणाले. मोठे मोठे बॅनर, पोस्टर वर आम्ही निर्णय करत नाही . जनतेच्या मनात काय आहे. कोण कार्यकर्ता जनतेच्या मनात आहे त्याच्या सर्वक्षण करून निर्णय घेतला जाईल. उमेदवारांचे सर्वेक्षण केले जाईल. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सन्मान दिला जाईल . निवडणुकीत ए बी फॉर्म हे प्रदेश कार्यालयातून दिले जाणार आहेत
पक्षाचा जिल्हाध्यक्ष हा महत्वाचा असतो. पक्षाने घेतलेला निर्णय अंतिम निर्णय असतो व पक्षाने रवी व्यास यांना जिल्हा अध्यक्ष बनवले असून पक्ष त्यांच्या सोबत असल्याचे बावनकुळे म्हणाले. पक्ष शिस्तीच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या नेत्याचे पक्ष ऑडिट करत असतो. वेळ आली की नेत्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. निवडणूक जिंकण्याची चिंता आम्हाला नसते, पक्ष मजबूत करण्याची चिंता करतो. एक आमदार हरला वा जिंकला तर पक्षाला काही फरक पडत नाही असे बावनकुळे म्हणाले.